ADITYA-L1 : सूर्याच्या दिशेने झेप, ‘आदित्य-एल1’ अंतराळात झेपावलं; भारत पुन्हा इतिहास घडवणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । चांद्रयान मोहीम यशस्वी केल्यानंतर आता भारताने आणखी एक महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे. भारताने थेट सूर्यावर जाण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प हाती घेतला आहे. भारताचं हे मिशन आजपासून सुरू झालं. श्रीहरीकोटा येथून भारताचं ADITYA-L1 हे यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे. भारताची ही पहिलीच सौर मोहीम आहे. त्यामुळे भारताची ही मोहीम यशस्वी होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बंगळुरू येथील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ संस्थेतून आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी हे आदित्य एल1 हे यान सूर्याच्या दिशेने झेपावलं. सूर्याच्या भोवती परिक्रमा करून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये एल-1 पॉईंट स्थापन करणं हा या मिशनचा हेतू आहे. हे भारताचं पूर्ण सौर मिशन आहे. या मिशनमुळे सौर मोहीम करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे.

पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणार
आदित्य एल 1 हे यान लॉन्च केलं गेलं आहे. आता हे यान अनेक टप्प्याने पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर करण्यात येईल. पृथ्वीला चार प्रदक्षिणा घातल्यानंतर हे यान पृथ्वापासून वेगळं होईल. त्यानंतर हे यान सूर्याच्या दिशेने पाठवलं जाणार आहे. यानाच्या लॉन्चिंगवेळी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ उपस्थित होते.

125 दिवसानंतर
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवल्यानंतर भारताने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. इस्रोने आदित्य एल 1 लॉन्च केलं. स्पेस स्टेशनमधून हे यान यशस्वीरित्या अंतराळात झेपावलं आहे. आज लॉन्चिंग झाल्यानंतर हे यान 125 दिवसानंतर एल-1 पॉइंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आदित्य एल 1 हे तिथून महत्त्वाचा डेटा पाठवणार आहे. त्यावरून अनेक महत्त्वाची माहिती मिळणार आहे.

नवा इतिहास घडणार
भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा भारताला नवा इतिहास रचण्याची संधी मिळाली आहे. सौर मिशनमधून केवळ भारतालाच नव्हे तर जगाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. सूर्याबाबतच्या संशोधनाला नवी कलाटणीही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारताने हे मिशन हाती घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *