अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव, पक्षचिन्ह मिळणार? जयंत पाटील म्हणाले, “आम्ही नव्याने…”

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ सप्टेंबर । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केली. सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट आणि शरद पवार गटाला नोटीस बजावली होती. यासंदर्भात दोन्ही गटाकडून तर्क-वितर्क केले जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत, तेव्हापासून जयंत पाटील शरद पवार यांच्यासोबत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला मिळणार असल्याचा दावा केला होता. लोकांच्या मनात शंका आहे की, राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. त्यामुळे सर्वांना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून निकाल येईल. हा निकाल शंभर टक्के अजितदादांच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांकडेच राहणार आहे. अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. यानंतर आता जयंत पाटील यांनीही अशाच प्रकारचे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवारांचे विश्वासू मानले गेलेले जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेप्रमाणेच आमचेही पक्षचिन्ह जाईल. जे शिवसेनेच्या बाबतीत घडले, तेच राष्ट्रवादीच्या बाबत घडले तर वावगे नाही. आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह जाईल, असे वाटत आहे. दुसऱ्यांना ते देऊन परत शिवसेनेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. असे जर झाल्यास आम्ही शिवसेनेसारखा परत नव्याने आम्ही संघर्ष करू, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्याप्रमाणेच आम्हीच राष्ट्रवादी आहोत, असा दावा केला आहे. तसेच आपल्याला सर्वात जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, अद्याप नेमका आकडा समजू शकलेला नाही. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे सुनावणी घेतल्यास शिवसेना पक्षाप्रमाणेच निवडणूक आयोग अनेक बाबी तपासू शकते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खरा अधिकार कुणाचा आहे, याचा निकाल देऊ शकते, असे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *