साताऱ्यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादी देणार खमक्या उमेदवार; ‘ही’ नावं चर्चेत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर | सातारा व माढा मतदारसंघांसह १४ लोकसभा मतदारसंघांतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरद पवार (Sharad Pawar) गटाची महत्त्वपूर्ण बैठक आज (बुधवारी) मुंबईत राष्ट्रवादी भवनात होणार आहे. यामध्ये सातारा व माढा लोकसभेसाठी कोण इच्छुक आहेत, त्याची चाचपणी होणार आहे.

साताऱ्यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने यांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे, तर माढ्यातून खमक्या उमेदवार नसल्याने येथे कोणाच्या नावावर चर्चा होणार, की महाविकास आघाडीला सोडले जाणार याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता खासदार शरद पवारांचा गट यावेळेस लोकसभेत आपली ताकद आजमावणार आहे. त्यासाठी त्यांनी मतदारसंघनिहाय चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे आढावा बैठक होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत १४ लोकसभा मतदारसंघांचा आढावा श्री. पवार घेणार आहेत. यामध्ये सातारा व माढा मतदारसंघांची बैठक सायंकाळी चार व पाच वाजता होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, तसेच इच्छुक नेतेमंडळी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

सातारा लोकसभेसाठी सध्यातरी खासदार पवार यांच्या गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याबरोबरच त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांचे नाव पुढे आहे, तसेच आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने यांच्या नावावर ही चर्चा होण्याची शक्यता आहे, तसेच माढा मतदारसंघाबाबत कोणाच्या नावाचा चर्चा होणार याची उत्सुकता आहे. एकूणच राष्ट्रवादीतील खासदार पवार गटाकडून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी देणार उदयनराजेंना टक्कर..
भाजपकडून सातारा व माढा लोकसभेवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. साताऱ्यातून खासदार उदयनराजेंना तिकीट दिले जाणार, की उमेदवार बदलला जाणार याची उत्सुकता असली, तरी भाजपच्या उमेदवाराला टक्कर देणारा उमेदवार राष्ट्रवादीच्या खासदार शरद पवार गटाकडून दिला जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *