मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज वाहनांना नो एण्ट्री, मुंबईकडे येणारी मार्गिका सहा तास बंद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ नोव्हेंबर ।। कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेची पुण्याकडून मुंबईकडे येणारी मार्गिका बंद ठेवण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवरील किलोमीटर क्रमांक नऊ येथे पनवेल एक्झिटवरून पर्यायी मार्ग मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुण्याच्या दिशेने जाणाया मार्गिकेवरील वाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे.


मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पनवेल- कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. उद्या चिखले ब्रिज येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील हलक्या, जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. पुणे येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना पनवेल एक्झिट येथून करंजाडेमार्गे कळंबोली सर्कल येथे येता येणार आहे. जुन्या मार्गावरून येणारी अनेक वाहने शेडुंग टोलनाक्यानंतर बोलें टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने येतात. मात्र उद्या या वाहनांना या मार्गाचा वापर करता येणार नाही. ही वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईच्या दिशेने येणार आहेत. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या हलक्या वाहनांना खोपोली एक्झिट येथून जुन्या महामार्गावर वळवण्यात येणार आहे. पुढे ही वाहने पनवेलमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच सणासुदीच्या काळात मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रेल्वे दुपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी एक्स्प्रेस वेची मुंबईकडे येणारी मार्गिका सुमारे सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे. ही सर्व वाहतूक जुन्या रस्त्याने वळवण्यात आल्यामुळे पनवेलकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पनवेलकरांची डोकेदुखी वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *