Dhanteras 2023 : आज धनत्रयोदशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्व

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १० नोव्हेंबर ।। Dhanteras 2023 : वसूबारसने दिवाळीची सुरूवात सर्वत्र दणक्यात झाली आहे. आज दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशी आहे. आजच्या दिवसाचे खास महत्व आहे. धनत्रयोदशीचा सण आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

९ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात झाली असून, १५ नोव्हेंबरला दिवाळीचा सण संपणार आहे. वसूबारसच्या सणाने दिवाळीची सुरुवात झाली असून त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज १० नोव्हेंबरला (शुक्रवारी) धनत्रयोदशी आहे. या धनत्रयोदशीच्या पूजेचे महत्व काय? आणि शुभ मुहूर्त काय? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.


धनत्रयोदशी
या वर्षी धनत्रयोदशी ही १० नोव्हेंबरला शुक्रवारी म्हणजे आज साजरी केली जाईल. या दिवशी धन्वंतरी देव, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी सोने-चांदीच्या वस्तूंची खरेदी केली जाते. या वस्तूंची खरेदी केल्यामुळे धनसंजयामध्ये सातत्याने वाढ होत जाते, असे मानले जाते.

धनत्रयोदशीची पूजा विधीपूर्वक केल्याने घरामध्ये सूख-शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे, ही पूजा योग्य पद्धतीने करण्याचा सल्ला दिला जातो.

धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त कधी ?
धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबरला १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, या कालावधीमध्ये तुम्ही धनत्रयोदशीची विधीपूर्वक पूजा करू शकता.

धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी पूजा, भगवान कुबेर आणि धन्वंतरी देव यांची पूजा आवर्जून केली जाते. आज या पूजेचा मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होणार असून ७ वाजून ४७ मिनिटांनी हा शुभ मुहूर्त संपणार आहे.

धनत्रयोदशीच्या पूजेचे महत्व काय ?
पौराणिक आख्यायिकेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनातून प्रकट झाले. त्यावेळी, त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेले पात्र होते अशी मान्यता आहे.

भगवान धन्वंतरींना भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते. त्यांचा प्रकटोत्सव म्हणून धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. आजच्या दिवशी सोने-चांदी, वाहन खरेदी करण्याचे ही विशेष महत्व आहे.

शिवाय, या दिवशी दान केल्याने संपत्तीमध्ये कित्येक पटींनी वाढ होते, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे, धनत्रयोदशीची पूजा ही विधीपूर्वक करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *