कांदा निर्यातबंदीने उडाला आंदोलनाचा भडका; शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ डिसेंबर।। केंद्र सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने त्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी उमटले. निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांत कांद्याचे सुरू असलेले लिलाव बंद पाडले.

जिल्ह्यातील चांदवड, मालेगाव, वणी, झोडगे, उमराणे, सिन्नर या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखून धरली. चांदवड येथे आक्रमक शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत वाहतूक मोकळी केली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती.

संगमनेरमध्ये दर दीड-दोन हजारांनी काेसळले
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कांद्याला प्रतिक्विंटल दीड-दोन हजार रुपये भाव कमी मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर सुमारे दोन-अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले.

सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या
शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अचानक कांद्याचे लिलाव बंद केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी बाजार समितीत आंदोलन केले. तत्काळ लिलाव सुरू करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला होता. शनिवारी बाजारपेठ बंद ठेवून दाखल झालेल्या कांद्याचा लिलाव केला जाईल, असे आश्वासन मिळताच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *