शेतमालाला भाव द्या! राज्यभरात शेतकऱ्यांची आंदोलने

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ डिसेंबर।। गेल्या वर्षभरापासून अडथळ्यांची शर्यत पार करत बळीराजा रब्बीच्या हंगामापर्यंत पोहोचला. मात्र, ऐन हाताशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. पिकांवर केलेला खर्चही न निघाल्याने आर्थिक संकट उभं झालं. त्यात कांदा निर्यातीवर बंदी, ऊस आणि कांद्याचे कोसळलेले दर, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांची झालेली कोंडी, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे अवकाळी आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हैराण झालेले शेतकरी रस्त्यांवर उतरत आहेत. रविवारीही आंदोलने सुरूच होती.

इथेनॉलनिर्मिती बंदी अध्यादेशाची शेतकऱ्यांनी केली होळी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारचा उसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीच्या अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने गुरुवारी देशातील सर्व साखर उद्योगांनी उसापासून इथेनॉलनिर्मिती बंद करावी, असा अध्यादेश काढला आहे.

मोर्चा अडवला; चौकातच मांडला ठिय्या

नाशिक : कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी प्रहार संघटना व शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा मोर्चा अशोकस्तंभावरच अडवला.

कांद्याचे लिलाव पाडले बंद

पारनेर (जि. अहमदनगर) : पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याचे भाव गडगडले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.

सोयाबीन, कापसाला भाव द्या

अकोला : मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांकडून कापूस आणि सोयाबीनला समाधानकारक भाव देण्याची मागणी केली जात आहे. अवकाळी पावसामुळे आधीच पिकांचे नुकसान झाले. त्यात मातीमोल दरात शेतमाल विकावा लागत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *