Weather Update: महाराष्ट्रासह ५ राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी ।। गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. काही भागात ढगाळ हवामान तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी तर काही भागात पाऊस सुरू आहे. उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीसह सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. अशातच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेतील थंडीची लाट कायम राहणार असून थंडीचा कडाका आणखीच तीव्र होणर आहे. तर दक्षिणेकडे मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे.

तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील १७ तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण २२ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात पुणे परिसरात पावसाची शक्यता
पुणे शहर आणि परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तविला. पुण्यात किमान तापमानाचा पारा १.७ अंश सेल्सिअसने वाढून १२.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला आहे. पुढील पाच दिवसांत तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असे खात्यातर्फे सांगण्यात आले. शहरात आठ ते दहा दिवसांपासून थंडी कमी-जास्त होत असल्याचे शिवाजीनगर येथील वेधशाळेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

दरम्यान. कोकणात बुधवारपासून, तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झाली. किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सियसच्यावर गेला आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १४ अंश सेल्सियसच्या वर आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *