पुण्याच्या ‘रातराणी’ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘या’ आहेत बसच्या पाच मार्गांच्या वेळा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ मार्च । पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पाच मार्गांवर सुरू केलेल्या रातराणी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत २७ लाख प्रवाशांनी रातराणी बसचा लाभ घेतला आहे. कात्रज ते शिवाजीनगर आणि कात्रज ते पुणे स्टेशन मार्गावर धावणाऱ्या रातराणीला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या मागणीनुसार पाच मार्गांवर रातराणी सुरू केल्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या मनमानी पद्धतीने भाडे अकराणीपासून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथे एसटी व रेल्वेने बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांना रातराणी बसचा चांगला फायदा होताना दिसत आहे. पीएमपीकडून साधारण पाच मार्गांवर एक ते दीड तासांच्या अंतराने रातराणी बस धावत आहेत. रात्रीच्या वेळी एका मार्गावर साधारण आठ फेऱ्या होतात.

या मार्गांवर रातराणी बस
कात्रज-शिवाजीनगर-कात्रज, कात्रज-पुणे स्टेशन-कात्रज, हडपसर-स्वारगेट-हडपसर, हडपसर-पुणे स्टेशन-हडपसर, पुणे स्टेशन-एनडीए गेट-पुणे स्टेशन अशा पाच मार्गांवर रातराणी बस धावतात. रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत ही सेवा दिली जात असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून पीएमपीला दरमहा पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. प्रत्येक बसचे प्रति किलोमीटर (ईपीके) उत्पन्न ४२ रुपयांपेक्षा जास्त आहे. बसचालकांनीदेखील बस सुटणाऱ्या स्थानकावर उभे राहून आवाज देऊन प्रवाशांना बोलवावे, अशा सूचना पीएमपीकडून करण्यात आल्या आहेत.

सहा महिन्यांत २७ लाख प्रवाशांनी घेतला लाभ
गेल्या सहा महिन्यांत रातराणी बसचा लाभ २७ लाख प्रवाशांनी घेतला आहे. त्यातून पीएमपीला पासचे उत्पन्न वगळता थेट तिकीट विक्रितून ३० लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये कात्रज-पुणे स्टेशन आणि कात्रज-शिवाजीनगर या मार्गावर प्रवासी संख्या अधिक आहे. सरासरी महिना एक लाख प्रवासी एका रातराणी बसधून प्रवास करीत आहेत.

रातराणीच्या पाच मार्गांच्या वेळा
– कात्रज ते वाकडेवाडी स्थानक (शिवाजीनगर) – १०.४०, मध्यरात्री १२.१५, पहाटे २.२०, ३.५५ आणि ५.२०

– वाकडेवाडी स्थानक (शिवाजीनगर) ते कात्रज – ११.३०, मध्यरात्री एक, पहाटे ३.१०, ४.४०

– कात्रज ते पुणे स्टेशन – ११, मध्यरात्री १२.३०, पहाटे २, ३.२५, आणि ५

– पुणे स्टेशन ते कात्रज – ११.५०, मध्यरात्री १.२०, २.४०, पहाटे ४.१०

– हडपसर ते स्वारगेट – १०.५०, ११.४०, मध्यरात्री एक, पहाटे ३.४५ आणि ५

– स्वारगेट ते हडपसर – ११.५०, मध्यरात्री १२.२०, पहाटे १.४०, ४.१५

– हडपसर ते पुणे स्टेशन – १०.४०, मध्यरात्री १२, पहाटे २.५०, ४.०५ आणि ५.१५

– पुणे स्टेशन ते हडपसर – ११.२०, मध्यरात्री १२.४०, पहाटे ३.२५ आणि ४.३५

– पुणे स्टेशन ते एनडीए गेट – १०, मध्यरात्री १२.३०, पहाटे ३.४५, ६.१५

– एनडीए गेट ते पुणे स्टेशन – ११.१५, मध्यरात्री १.४५, पहाटे ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *