मनसे शिवसेनेत विलीन करा, अध्यक्ष व्हा ! भाजप, सेनेकडून प्रस्ताव ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मार्च । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात लोकसभा निवडणूक आणि युतीसंदर्भात चर्चा झाली. शिवसेना, भाजपकडून राज ठाकरेंना तीन प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतं. मनसेला देण्यात आलेले प्रस्ताव महायुतीला राज ठाकरेंची साथ दीर्घकाळ हवी असल्याचं अधोरेखित होत आहे.

राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन अमित शहांसोबत ४० मिनिटं चर्चा केली. त्यानंतर राज मुंबईत परतले. ताज लँड्स एन्डमध्ये राज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. मनसे आणि शिवसेनेचे विलिनीकरण करुन शिवसेनेचे अध्यक्षपद तुम्ही घ्या, अन्यथा लोकसभेला पाठिंबा द्या, त्याबदल्यात विधानसभेला सन्मानजनक जागा घ्या किंवा मग लोकसभेला एक-दोन जागा घ्या, पण मग विधानसभेला कमी जागा मिळतील, असे तीन प्रस्ताव राज यांना शिवसेना, भाजपकडून देण्यात आल्याचं वृत्त ‘लोकमत’नं दिले आहे.

राज ठाकरे आणि भाजप, शिवसेनेत सुरू असलेल्या चर्चा बऱ्याच व्यापक असल्याचं समजतं. लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या इतक्यापुरतीच ही चर्चा मर्यादित नाही. राज यांना महायुतीसोबत कसं आणता येईल, त्यांना दीर्घकाळासाठी सोबत कसं ठेवता येईल या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगानं राज यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. पण याबद्दल शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यापैकी कोणीही माध्यमांसमोर कोणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही.

शिंदे-राज यांची केमिस्ट्री, ठाकरेंना थेट टक्कर
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना आणि मनसे यांचं विलिनीकरण हा विषय दोन ते तीन बैठकांमध्ये चर्चेचा विषय होता. त्याबद्दल राज यांनी कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. ते या प्रस्तावाबद्दल अनुकूल नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *