Aditya L1 Mission : सूर्याचा अभ्यास करणं सोपं काम नाही! ‘आदित्य एल-1’ समोर कोणती आव्हानं? जाणून घ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । ISRO Aditya L1 : भारताच्या पहिल्या सौर मोहिमेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 2 सप्टेंबर रोजी ‘आदित्य’ हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हा उपग्रह पृथ्वीपासून दूर, अंतराळातील एका पॉइंटवरून सूर्याचा अभ्यास करेल. मात्र, सूर्याचं निरीक्षण करण्यासाठी एवढा खटाटोप करण्याची गरज का आहे?

सूर्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न ही काही नवीन गोष्ट नाही. आपली सूर्यमाला ज्या ताऱ्याभोवती तयार झाली आहे, त्याचा आपल्यावर परिणाम होणारच. त्यामुळे, गेल्या कित्येक शतकांपासून सूर्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न खगोलशास्त्रज्ञ करत आहेत. आता इस्रो देखील स्वतंत्रपणे सूर्याचा अभ्यास करणार आहे.

पृथ्वीवरून मर्यादा
पृथ्वीवरून सूर्याचा अभ्यास करण्याला भरपूर मर्यादा आहेत. पृथ्वीवर सूर्याची किरणं पोहोचताना मध्ये वातावरणातील विविध थर आणि ओझोनचा ‘फिल्टर’ असतो. मात्र, अंतराळात असं काहीही नाही. त्यामुळेच, पृथ्वीवरून सूर्याचा केवळ मर्यादित अभ्यास करता येतो. अंतराळात असं काहीही नसल्यामुळे, तिथून सूर्य अधिक स्पष्टपणे पाहता येतो. यामुळेच अंतराळात जाऊन सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करता येतो.

अर्थात, सूर्याचा अभ्यास करणं तितकं सोपं काम नाही. सूर्याच्या जास्त जवळ गेल्यास अंतराळयान, उपग्रह किंवा त्यावरील उपकरणे जळून जाण्याची शक्यता असते. ही गोष्ट तर उघडच आहे. मात्र, एवढीच एक अडचण नाही. सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल ही दुसरी एक समस्या आहे.

अधिक इंधनाची गरज
जर आपला सूर्य संपूर्ण सूर्यमालेला आपल्या कक्षेत ठेऊ शकतो, तर त्याचं गुरुत्वाकर्षण बल नक्कीच भरपूर असणार आहे. यामुळेच, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणारा उपग्रह किंवा यान त्यादिशेने ओढलं जाऊ नये यासाठी विशेष उर्जा खर्च करावी लागते. यासाठी अधिक इंधनाची गरज आहे.

सूर्याचं अध्ययन करण्यासाठी कित्येक उपकरणांची आवश्यकता असते. ही सर्व उपकरणे अंतराळात नेणे, त्यांना विशिष्ट ठिकाणी कायम ठेवणे आणि त्याद्वारे डेटा कलेक्शन किंवा संशोधन करणे ही सौर मोहिमेची प्रमुख उद्दिष्टं असतात. त्यामुळे सौर मोहीम यशस्वी करण्यासाठी भरपूर इंधन, संयम आणि खर्चाची गरज असते.

इस्रो कसं करणार संशोधन?
इस्रोच्या ‘आदित्य एल-1’ मोहिमेचं बजेट सुमारे 400 कोटी रुपये आहे. यामध्ये आदित्य नावाचा उपग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येईल. हा पॉइंट अशा ठिकाणी आहे, जिथे सूर्याचं आणि पृथ्वीचं गुरूत्वाकर्षण हे काही प्रमाणात समान लागू होतं. यामुळे या उपग्रहाला एका ठिकाणी ठेवण्यासाठी अधिक इंधन खर्च करण्याची गरज भासणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *