आमदार अपात्रतेची सोमवारपासून सुनावणी; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनाही नोटीस बजावणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ सप्टेंबर । सर्वोच्च न्यायालयाने विलंबाबाबात ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारपासून आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजाविण्यात येणार आहे. वेळ पडली तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावणीसाठी विधिमंडळ कार्यालयाकडून नोटिसा पाठवण्यात येतील, अशी माहिती नार्वेकर यांनी शुक्रवारी दिली. या नोटिसा शनिवारीच विधिमंडळ कार्यालयाकडून पाठवण्यात येतील.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी नवी दिल्लीत विविध कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत केली. ‘माझा दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित होता. या दौऱ्यात कायदेतज्ज्ञांशी भेट झाली. सर्वोच्च न्यायालयाने एका आठवडय़ात सुनावणी घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढील आठवडय़ात सुनावणी घेतली जाईल. निर्णय घेताना कोणतीही घाई अथवा दिरंगाई केली जाणार नाही, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. आमदार अपात्रतेसंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट असताना त्यांनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा राज्यात मान राखला जात नाही. विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घ्यायचा हे ठरविण्यासाठी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात जावे लागत असेल तर आमच्या मनात ज्या शंका आहेत त्यांना बळ मिळत आहे, असे राऊत यांनी सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट निर्देश दिले असताना कागदपत्रे मिळाली नाहीत, या नावाखाली वेळकाढूपणा सुरू असला तरी त्यांना आठवडाभरात निर्णय करावाच लागणार आहे, असे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *