लक्षात ठेवा, माझ्या अध्यक्षपदाच्या पत्रावर तुमच्याच सह्या आहेत, अजितदादा गटाला शरद पवारांनी ठणकावले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर | राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर माझी निवड योग्य नाही म्हणता, पण त्या पत्रावर तुमच्याच सह्या आहेत, असं ठणकावून सांगत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आपल्याच बाजूने लागेल. मात्र निकाल काहीही लागला तरी चिंता करण्याचं कारण नाही. मी पाच निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आणि निवडून आलो. चिन्हं बदललं तरी लोक आपला निर्णय बदलत नाही. आपण संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि देशातलंही वातावरण बदलत आहे, असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जान भरली.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या विस्तारित कार्य समितीची बैठक आज राजधानी नवी दिल्लीत संपन्न झालीये. दुसरीकडे निवडणूक आयोगात उद्या राष्ट्रवादी कुणाची यासंबंधीची महत्तपूर्ण सुनावणी होतीये. त्याआधी या बैठकीनंतर शरद पवार यांनी पदाधिकारी-नेत्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी अतिशय आक्रमक होऊन अजित पवार गट आणि भाजपला खडे बोल सुनावले.

आज अनेक राज्यात भाजपची सरकारे नाहीत. काही राज्यातील विरोधी पक्षाची सरकारं पाडून अनेक ठिकाणी भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. भाजपने ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनाच सोबत घेतलंय. त्यामुळे भाजपने आता त्यांच्या पक्षाचं कमळ हे चिन्ह बदलावं आणि वॉशिंग मशिन घ्यावं. आज आपण अनेक राज्यांवर नजर टाकली तर तिथे भाजप नाहीये. केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिसा अशी उदाहरणे देत देशातलं वातावरण बदलतंय असं सांगून केंद्रात सत्ताबदल होईल, असे अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *