मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; अनेक राज्यात थंडीची चाहूल !

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर | यंदा मॉन्सूनने जास्तच लहरीपणा दाखवला आहे. त्याचे आगमन उशीराने झाले. तसेच पूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला. तसेच आता काही राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता निदान परतीच्या प्रवासात तरी वरुणराजाने कृपा करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आता काही राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून काही राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.

दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. तर, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधून हळूहळू मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून महाराष्ट्रातूनही येत्या काही दिवसांत त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या 24 तासांत कोकण आणि विदर्भात मूसळधार, तर पुढील 48 तासात मुंबई, पुणे, ठाणे येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालयमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढेल. उत्तर हिमालय क्षेत्रामध्ये काही भागांमध्ये पावसाच्या हजेरीसोबतच काही ठिकाणांवर तापमानाचा आकडाही कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हिमाचल आणि उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर, बहुतांश भागात तापमान अपेक्षेहून कमी नोंदवले जाण्याचीही शक्यता आहे. येत्या काळात देशाच्या उत्तरेकडील थंडीची ही चाहूल महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *