NCP Crisis: खरी राष्ट्रवादी कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून सुनावणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा करत अजित पवार यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. तसंच शरद पवार यांच्याकडून सुद्धा निवडणूक आयोगासमोर लेखी उत्तर सादर करण्यात आलं आहे.

आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून या प्रकरणाची सुनावणी होणार असून राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगासमोर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी, तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मणिंदर सिंह हे बाजू मांडणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगासमोर सुमारे ९ हजार प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडूनही ६ ते ७ हजार प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. आज होणाऱ्या सुनावणीत आकड्यांचा विचार करता निर्णय आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास अजित पवार गटाकडून व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे निकाल काहीही लागला तरी संभाव्य परिणामांची चिंता करण्याची गरज नाही, अशी आक्रमक भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. काही लोकांचे निवडणूक चिन्ह बदलण्याचे कारस्थान असू शकते. पण मतदार हे हुशार असतात. निवडणूक चिन्ह बदलले तरी कुठले बटण दाबायचे त्यांना ठाऊक असते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *