Ajit Pawar Baramati : अजित पवारांवर नामुष्की? मराठा आंदोलकांमुळे बारामतीत जाणं टाळलं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही दिवसांपासून पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी यासाठी अमरण उपोषण सुरू केलं आहे. यादरम्यान राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामुष्कीचा सामना करावा लागला आहे. मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे अजित पवारांना बारामती तालुक्यातील त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे.

बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली. त्यातून सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

अजित पवारांकडून हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यभरात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी तसेच राजकीय कार्यक्रमांना मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध केला जात आहे. बारामती मध्ये देखील अजित पवारांच्या या दौऱ्याला विरोध केला जात होता. काल तसं लेखी निवेदन स्थानिक पोलीस आणि कारखान्याच्या प्रशासनाला देण्यात आलं होतं. काल दिवसभर चर्चा झाल्यानंत देखील तोडगा निघू शकला नव्हता. अखेर अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या या कर्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संभाव्य संघर्ष टळला आहे.

यावेळी पोलिसांनी कारखान्याच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच सकाळ पासूनच मराठा आंदोलक देखील या कार्यक्रमस्थळी जमा होत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *