Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ डिसेंबर ।। मनोज जरांगे काय म्हणाले?

“मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय संपल्यानंतर मी शेतकऱ्यांचा विषय हातात घेणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर कसे देत नाहीत आणि धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न कसा मार्गी लागत नाही? तेही मी पाहतो. शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागला पाहिजे. मराठा समाजाच्या एकजुटीमुळे दोन कोटी पेक्षा जास्त मराठा समाज आतापर्यंत आरक्षणामध्ये गेला. आता येत्या २५ जानेवारी रोजी मी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे. उपोषण मला किती सहन होईल हे मला माहिती नाही. पण मी माझ्या समाजासाठी मरायलाही तयार आहे”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

“आता काहीजण म्हणत आहेत की, तेच (महायुतीचं) सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे. मग आरक्षण देतील का? पण आता खरी मजा आहे, हिशेब चुकता करण्याची. आता होऊ द्या, कारण आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते. मी मराठा आरक्षणाला विरोध करत नाही, मी तर आरक्षण द्या म्हणतो, असं म्हणायचे. मग आता समजेल की ते (देवेंद्र फडणवीस) मराठा आरक्षण देतात की नाही”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कोणाचंही थेट नाव घेतलं नाही. मात्र, त्यांच्या विधानाचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता, अशी चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं प्रत्युत्तर
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही. आरक्षण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये पहिल्या दिवसांपासून मी असेल किंवा एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील, आमच्या भूमिकेत कोणतंही अंतर नाही. जे निर्णय आम्ही घेतले ते तिघांनी मिळून घेतले. यापुढेही जे निर्णय घ्यायचे ते आम्ही तिघेजण मिळून घेऊ”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *