महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ डिसेंबर ।। गोव्यात कळंगुट बीचवर पर्यटकांची बोट उलटल्याची दुर्घटना घडलीय. बुधवारी उत्तर गोव्यातल्या कळंगुट बीचवर घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर २० पेक्षा जास्त पर्यटक बोटीतून प्रवास करत होते. २० जण जखमी झाले आहेत. तर एकाच कुटुंबातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंगुट बीचवर २५ ते ३० पर्यटकांना घेऊन गेलेली बोट समुद्रात उलटली. लाइफ गार्ड इनचार्ज संजय यादव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, कळंगुट बीचवर एक नाव उलटलीय. यातील १३ जणांना आम्ही वाचवलंय. नेमका आकडा माहिती नाही पण बोटीखाली अडकलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. बोट कशामुळे उलटली हे माहिती नाही. पण बोटी खाली अडकलेल्या सहा जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केलीय. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे. बुधवारी दुपारी कळंगुट बीचवर ही घटना घडली. लाइफगार्ड एजन्सी दृष्टी मरीन लाइफसेवर्सकडून २० पेक्षा जास्त प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.