महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ७ फेब्रुवारी २०२६ || पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पुन्हा एकदा दहशतवादाच्या छायेखाली सापडली आहे. शुक्रवारी नमाजाच्या वेळी शहजाद टाउनमधील तरलाई इमामबारगाह या शिया मशिदीत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ५० हून अधिक जणांचा मृत्यू, तर शंभरहून अधिक जण जखमी झाले. अलिकडच्या वर्षांतील शिया समाजावर झालेल्या भीषण हल्ल्यांपैकी हा एक मानला जात असून, या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. स्फोटानंतर लगेचच काही पाकिस्तानी माध्यमे आणि घटकांकडून या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र, भारताने हे आरोप ठाम शब्दांत फेटाळून लावले आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, इस्लामाबादमधील मशिदीत झालेला बॉम्बस्फोट अत्यंत निषेधार्ह असून, या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या लोकांबद्दल भारत तीव्र शोक व्यक्त करतो. मात्र, आपल्या देशातील सामाजिक आणि सुरक्षात्मक अपयशांकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी पाकिस्तानने पुन्हा एकदा परदेशावर दोष ढकलण्याचा मार्ग निवडला असल्याची टीका त्यांनी केली. “भारताविरोधातील हे आरोप पूर्णपणे निराधार आणि निरर्थक आहेत,” असे स्पष्ट करत भारताचा या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने ठासून सांगितले.
दरम्यान, स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना घडला. प्राथमिक तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याचे निष्पन्न झाले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, हल्लेखोराला मशिदीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकांनी रोखले होते. त्यामुळे तो आत प्रवेश करू शकला नाही, तरीही प्रवेशद्वाराजवळच झालेल्या स्फोटामुळे मोठी जीवितहानी झाली. इस्लामाबादसारख्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेच्या शहरात असे हल्ले तुलनेने दुर्मिळ मानले जातात. मात्र, अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचारात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे.
विशेषतः शिया अल्पसंख्याक समुदाय याआधीही वारंवार लक्ष्य बनला आहे. बलुचिस्तान आणि इतर भागांतील हल्ल्यांनंतरही पाकिस्तानकडून भारतावर आरोप करण्यात आले होते. इस्लामाबादमधील या ताज्या स्फोटानंतरही तीच भूमिका पुन्हा समोर आली आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानने स्वतःच्या अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी झाकण्यासाठी असे आरोप करणे थांबवावे. हा हल्ला केवळ एका देशाचा प्रश्न नसून, संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेसाठी गंभीर इशारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
