Devendra Fadnavis : ‘गुजरातचे कंत्राटदार’ वाद पेटला; फडणवीसांचा पलटवार

Spread the love

Loading

राज ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर; ‘बिड कॅपॅसिटी’ असणाऱ्यांनाच कंत्राट

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट २०२६ ।।नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवरून नाशिकमध्ये राजकीय वाद पुन्हा पेटला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधून कंत्राटदार आणल्याचा आरोप करत थेट सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात कंत्राटदार नाहीत का, असा सवाल करत त्यांनी ‘वरून आदेश येतील तसे कुंभमेळे करायचे’ अशी बोचरी टीका केली. राज ठाकरेंच्या या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले आहे. कंत्राट देताना कंत्राटदाराची जात, भाषा किंवा धर्म पाहिला जात नाही. ज्यांची काम पूर्ण करण्याची ‘बिड कॅपॅसिटी’ आहे, त्यांनाच कंत्राट दिले जाते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या कामांवरून सुरू झालेला राजकीय सामना आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात कुंभमेळ्याच्या कामांवरून सरकारला धारेवर धरले होते. अनेक कंत्राटदार गुजरातमधून आणल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मलेच नाहीत का, असा सवाल करत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनी कंत्राट प्रक्रिया पारदर्शक आणि स्पर्धात्मक असल्याचे सांगितले. कंत्राट देताना संबंधित कंपनीच्या मागे कोण व्यक्ती आहे, त्याची जात किंवा भाषा काय आहे, हे पाहिले जात नाही. कंत्राटासाठी पात्रता आणि काम पूर्ण करण्याची क्षमता हा मुख्य निकष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कंत्राटे स्पर्धात्मक पद्धतीने आणि कमी दरात देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

कामाच्या गुणवत्तेवर तीन पातळ्यांवर तपासणी

कुंभमेळ्याच्या कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी तीन प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार असून, तपासणी पूर्ण झाल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराला पैसे दिले जाणार नाहीत. त्यामुळे कंत्राट कोणाला मिळाले यापेक्षा कामाचा दर्जा आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण होते का, हे महत्त्वाचे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

दरम्यान, नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांवरूनही सरकारवर टीका होत आहे. यावर फडणवीस यांनी एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइन कामाचा संदर्भ दिला. घरोघरी गॅस कनेक्शन देण्यासाठी रस्ते खोदण्यात आले असून कामाचा वेग कमी असल्याने रस्ते दुरुस्तीला अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत दोन लाख कनेक्शन देणे अपेक्षित असताना केवळ ४४ हजार कनेक्शनचे काम झाल्याचे त्यांनी नमूद केले. कुंभमेळ्यामुळे नाशिकमध्ये अनेक यंत्रणा एकाचवेळी काम करत असल्याने सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी महापालिकेने स्पष्ट सूचना फलक लावावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

कर्जमाफीबाबतही फडणवीसांची मोठी माहिती

शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती दिली. आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण होत जाईल, तसे शेतकऱ्यांची कर्जखाती ‘नील’ करण्याची प्रक्रिया पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या सीबील स्कोअरवर परिणाम होणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. कर्ज मिळताना अडचणी निर्माण होतील किंवा ओटीएसमुळे सीबील स्कोअरवर परिणाम होईल, अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगत सीबीलची अट लागू होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कंत्राटांपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंत फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *