सहा औषधांचे नमुने निकृष्ट; FDA तपासणीत अस्वच्छता आणि गंभीर नियमभंग उघड
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट २०२६ ।। पुणे : आजार बरा करण्यासाठी ज्या आयुर्वेदिक औषधांवर नागरिक विश्वास ठेवतात, त्याच औषधांमध्ये बुरशी, कीटक आणि अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी एमआयडीसी परिसरातील इंड्युकेअर फार्मा प्रा. लि. या कंपनीच्या सहा आयुर्वेदिक औषधांमध्ये गंभीर गुणवत्ताविषयक त्रुटी आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कंपनीचा आयुर्वेदिक औषध उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. औषधांच्या गुणवत्तेबरोबरच उत्पादन प्रक्रियेतही अनेक गंभीर अनियमितता आढळल्याने FDAने ही कठोर कारवाई केली. त्यामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
FDAच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची दोन वेळा तपासणी केली. या तपासणीदरम्यान औषधे व प्रसाधने कायदा तसेच उत्पादनासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. औषध निर्मितीची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसणे, बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड अपूर्ण असणे, कच्च्या मालाच्या गुणवत्तेच्या आवश्यक चाचण्या न करणे आणि प्रयोगशाळेत पुरेशा सुविधा नसणे, अशा त्रुटी समोर आल्या. एवढेच नव्हे तर उत्पादन विभागातील अस्वच्छता, यंत्रसामग्रीची योग्य नोंद नसणे, तापमान व आर्द्रता नियंत्रणाची व्यवस्था नसणे आणि तयार औषधांच्या विक्रीची नोंद उपलब्ध नसल्याचेही तपासणीत उघड झाले. म्हणजे औषधांच्या गुणवत्तेपासून उत्पादन व्यवस्थेपर्यंत अनेक पातळ्यांवर नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
सहा औषधांमध्ये नेमकं काय आढळलं?
FDAने तपासणीसाठी घेतलेल्या सिंहनाद गुग्गुळ, पुनर्नवादी मंडूर, त्रिफळा गुग्गुळ, कांचनार गुग्गुळ, हिंगवष्टक चूर्ण आणि त्रिफळा चूर्ण या सहा औषधांच्या नमुन्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. काही नमुन्यांमध्ये बुरशीची वाढ झालेली होती, तर सूक्ष्मजंतूंचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळले. काही गोळ्यांवर काळे डाग होते. चूर्णाच्या नमुन्यांमध्ये कीटक, अळ्या तसेच इतर बाह्य अशुद्ध पदार्थ आढळल्याने ही औषधे निकृष्ट दर्जाची घोषित करण्यात आली. औषध म्हणजे आरोग्याचा आधार; मात्र त्यातच अशुद्धता आढळणे ही बाब ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे.
या अनियमितता आढळल्यानंतर FDAने कंपनीला उत्पादन तात्काळ बंद करण्याचे आदेश देत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीला लेखी खुलासा करण्याची तसेच वैयक्तिक सुनावणीची संधीही देण्यात आली. मात्र कंपनीकडून समाधानकारक स्पष्टीकरण किंवा नियमांचे पालन केल्याचे आवश्यक पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे उपलब्ध सर्व कागदपत्रे, तपासणीतील निष्कर्ष आणि कंपनीची बाजू यांचा विचार केल्यानंतर अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांनी इंड्युकेअर फार्माचा आयुर्वेदिक औषध उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला. FDAच्या या कारवाईमुळे औषधनिर्मितीत दर्जा आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या उत्पादकांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.
