![]()
मेट्रोच्या कामाने रस्ता अरुंद; चौकाचौकांत वाहतूक ठप्प, प्रवाशांचा रोजचा खोळंबा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट २०२६ ।। पुणे : नगर रस्ता आणि सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची चर्चा सुरू असतानाच आता शहराच्या दक्षिणेकडील प्रमुख मार्गाचीही तीच अवस्था झाली आहे. स्वारगेट ते कात्रज या सातारा रस्त्यावर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीचा वेग अक्षरशः रेंगाळला आहे. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनचालकांना काही किलोमीटरच्या अंतरासाठी मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. स्वारगेट परिसरापासून सुरू होणारी कोंडी उत्सव चौक, डी-मार्टसमोरील चौक आणि कात्रज चौकापर्यंत पोहोचत आहे. प्रमुख चौकांवरील सिग्नलवर वाहनांच्या रांगा वाढत असल्याने या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्यांचा संयमही आता संपत चालला आहे.
स्वारगेट-कात्रजदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे प्राथमिक टप्प्यातील काम सुरू आहे. कामासाठी रस्त्याचा काही भाग व्यापला गेल्याने उपलब्ध रस्ता आणखी अरुंद झाला आहे. त्यातच सकाळ-संध्याकाळच्या पीक अवरमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. परिणामी चौकांमध्ये वाहनांची गर्दी साचते आणि काही वेळातच त्याचा फटका मागील चौकांनाही बसतो. एक चौक मोकळा होईपर्यंत दुसऱ्या चौकात रांग तयार झालेली असते, अशी परिस्थिती अनेकदा दिसून येत आहे. त्यात अपघातांच्या घटनांची भर पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालक बीआरटी मार्गाचा आधार घेत आहेत. मात्र यामुळे बीआरटी लेनमध्येही वाहनांची गर्दी वाढत असून, वाहतुकीचा गोंधळ आणखी वाढतो. अरुंद रस्ता, मेट्रोचे काम, वाढलेली वाहनसंख्या आणि चौकांवरील विस्कळीत वाहतूक यांचा एकत्रित परिणाम या मार्गावर दिसत आहे. मेट्रोचे काम आणखी काही महिने सुरू राहणार असल्याने ‘काम सुरू आहे, त्यामुळे कोंडी होणारच’ एवढ्यावर प्रशासनाने हात झटकणे आता पुरेसे ठरणार नाही. प्रवाशांचा वेळ, इंधन आणि सुरक्षितता यांचाही विचार करावा लागणार आहे.
वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान
स्वारगेट, सहकारनगर, मार्केट यार्ड आणि भारती विद्यापीठ वाहतूक विभागांनी एकत्रितपणे या मार्गासाठी तातडीचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिस आणि वॉर्डनची संख्या वाढविणे, गर्दीच्या वेळेत सिग्नलची वेळ बदलणे आणि सर्व सिग्नलचे योग्य सिंक्रोनायझेशन करणे आवश्यक आहे. तसेच मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन वाहतुकीसाठी उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. आज सातारा रस्ता कोंडीत अडकला आहे; उद्या ही कोंडी आणखी वाढण्याची वाट पाहणार का? प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर स्वारगेट-कात्रज प्रवास पुणेकरांसाठी रोजची डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे.
