![]()
रक्तसुरक्षेसाठी पहिल्यांदाच राज्यभर कॉम्प्लायन्स ऑर्डर; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट २०२६ ।।मुंबई : रक्त म्हणजे रुग्णासाठी जीवनाची आशा; त्यामुळे त्याच्या संकलनापासून रुग्णाच्या हातात पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्पा सुरक्षित असणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील सर्व परवानाधारक रक्तकेंद्रे आणि रक्तसाठवणूक केंद्रांसाठी प्रथमच सर्वसमावेशक ‘कॉम्प्लायन्स ऑर्डर’ जारी केला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली जारी करण्यात आलेल्या या आदेशामुळे रक्तकेंद्रांच्या कामकाजाला आता एकसमान नियमांची चौकट मिळणार आहे. रक्तसुरक्षा, गुणवत्तेचे निकष आणि नियामक नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्या केंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रक्तकेंद्रांच्या कार्यपद्धतीवर आता अधिक कडक देखरेख राहणार आहे.
FDAच्या आदेशानुसार रक्तसंकलनापासून रक्त वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. रक्तकेंद्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असणे, रक्तदात्यांची योग्य निवड करणे, रक्त आणि रक्तघटकांची अनिवार्य तपासणी करणे, निर्धारित तापमानात रक्तसाठवणूक करणे, गुणवत्ता नियंत्रणाची अंमलबजावणी करणे आणि जैववैद्यकीय कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रक्ताची सुरक्षित वाहतूक तसेच ई-रक्तकोश पोर्टलवर दररोज आवश्यक माहिती अद्ययावत करणे यावरही विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे रक्ताची उपलब्धता आणि साठ्याची माहिती अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
प्रत्येक रक्तपिशवीची पाच आजारांसाठी तपासणी
राज्यातील काही रक्तकेंद्रांच्या तपासणीदरम्यान शेड्यूल एफ, भाग XII-B मधील नियमांचे पूर्ण पालन होत नसल्याचे FDAच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे राज्यभर एकसमान नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. आता प्रत्येक रक्तपिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, सिफिलिस आणि मलेरिया यांसाठी तपासणी करणे अनिवार्य राहणार आहे. त्याचबरोबर रक्तकेंद्रांना नियमितपणे सेल्फ-ऑडिट करून आपल्या व्यवस्थेतील त्रुटी शोधणे आणि त्या दूर करणेही आवश्यक करण्यात आले आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण रक्त मिळणे हा प्रत्येक रुग्णाचा अधिकार आहे. या आदेशामुळे राज्यातील रक्तकेंद्रांमध्ये एकसमान दर्जा, पारदर्शकता आणि गुणवत्ता नियंत्रण अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रक्तकेंद्रांमधील गैरप्रकार आणि नियमभंगाच्या तक्रारी समोर आल्यानंतर FDAने हा निर्णय घेतला आहे. विशेषतः रक्तसंकलन शिबिरे, रक्ताची उपलब्धता आणि दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे या बाबींमध्ये अधिक सुसूत्रता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या नव्या आदेशाचा थेट फायदा शेवटी रक्ताची गरज असलेल्या रुग्णांनाच होणार आहे.
