दिवाळीच्या विशेष मोहिमेत ७३ आस्थापनांची तपासणी; ४३ परवाने निलंबित, १७ हजार ८२४ किलो खाद्यपदार्थ जप्त; ६३.०९ लाखांचा माल कारवाईच्या कचाट्यात.
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिवाळीच्या गोडधोडात भेसळीचा विषारी खवा मिसळणाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जोरदार दणका दिला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत बृहन्मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या सात विभागांतील ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४३ खाद्यव्यवसायांचे परवाने आणि नोंदण्या निलंबित करण्यात आल्या. तब्बल १७ हजार ८२४ किलो खाद्यपदार्थांचा सुमारे ६३ लाख ९ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. नागपूर विभागात सर्वाधिक १८ परवान्यांवर कारवाई झाली. नाशिकमध्ये नऊ, बृहन्मुंबईत पाच, तर पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी तीन आणि कोकण विभागात दोन परवाने निलंबित करण्यात आले.
मिठाई, खवा-मावा, पनीर, पेढे, काजू कतली, कलाकंद, बर्फी, हलवा, फरसाण, चिवडा, नमकीन, सुका मेवा आणि खाद्यतेल विक्रेत्यांची झाडाझडती घेण्यात आली. तपासणीत अस्वच्छ उत्पादन व साठवणूक, कीटक नियंत्रणाचा अभाव, खिडक्यांना जाळ्या नसणे, अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्या नोंदींची अनुपलब्धता, पाणी तपासणी अहवाल आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे नसल्याचे आढळले. महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांतूनही ३ हजार ९३५ किलो खवा आणि मिठाई जप्त करण्यात आली. सार्वजनिक आरोग्यास घातक ठरू शकणारे नाशवंत पदार्थ पंचांच्या उपस्थितीत जागेवरच नष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईत Blink Commerce अर्थात Blinkit या कंपनीच्या वर्धा येथील आस्थापनेचाही परवाना निलंबित करण्यात आला.
पुणे विभागात ३ हजार १४२ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ५ लाख ६६ हजार ५० रुपये आहे. कोकण विभागात तब्बल १३ हजार ९७० किलो माल जप्त झाला. छत्रपती संभाजीनगर विभागात ६५२ किलो, तर अमरावतीत ३६५ किलो खाद्यपदार्थ जप्त झाल्याची विभागनिहाय आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय मुंबईतील बोरिवली आणि भांडुप येथे अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पाच प्रकरणांत ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंढे यांनी ब्रँड मोठा असो अथवा छोटा, नियम सर्वांसाठी समान असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. मात्र, प्रश्न एवढाच की सणासुदीपुरती धडक मोहीम पुरेशी आहे का? ग्राहकांच्या ताटात विषारी भेसळ पोहोचण्यापूर्वीच नियमित तपासणी झाली पाहिजे. अन्यथा दरवर्षी दिवाळीत छापे, जप्ती आणि परवाने निलंबित करण्याच्या बातम्या येतील; पण भेसळखोरांचा धंदा मात्र सुरूच राहील!
