![]()
भोसरी–उंड्री आणि भूगाव–एरंडवणे भुयारी मार्गांचा प्रस्ताव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पाताळ लोक’ संकल्पनेला गती देण्याचे प्रयत्न, मात्र वाहतूककोंडीमुक्त पुण्याचे स्वप्न अजूनही कागदावरच!
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पुण्याच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी, चौकाचौकांत कोंडी आणि प्रवासात तासन्तास वाया जाणारा वेळ, ही आता शहराची ओळख बनू लागली आहे. या वाहतूककोंडीवर जमिनीवर रस्ते वाढविण्याऐवजी जमिनीखालून मार्ग काढण्याचा पर्याय पुणे महापालिकेने पुढे आणला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पाताळ लोक’ संकल्पनेअंतर्गत भोसरी ते उंड्री असा २३ किलोमीटरचा आणि भूगाव येथील राम नदीपासून एरंडवणे येथील डी. पी. रोडपर्यंत आठ किलोमीटरचा असे दोन भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. एकूण ३१ किलोमीटरच्या या मार्गांमुळे शहराच्या उत्तर-दक्षिण आणि पश्चिम भागातील वाहतुकीला पर्यायी जोडणी मिळण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाचा पर्याय चर्चेत होता; मात्र त्यानंतर नव्या मार्गांचा अभ्यास पुढे आला.
पहिल्या प्रस्तावित मार्गात भोसरी, संगमवाडी, धोबीघाट, पुणे कॅन्टोन्मेंट, कोंढवा आणि उंड्री अशी जोडणी अपेक्षित आहे. दुसरा मार्ग भूगाव, राम नदी, डुक्कर खिंड आणि एरंडवणे परिसराला जोडणार आहे. या मार्गांची आखणी करताना TomTom Origin-Destination डेटा, Google Traffic, प्रत्यक्ष वाहनांची वर्दळ आणि प्रवासाच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद आहे. याशिवाय एचसीएमटीआर, इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड आणि महामेट्रो यांच्याशी समन्वय साधण्याचा विचार आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तज्ज्ञ सल्लागार नेमून सविस्तर व्यवहार्यता अभ्यास आणि डीपीआर तयार करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी दिल्याचे दिलेल्या माहितीत म्हटले आहे. मात्र, भुयारी मार्गांची अंतिम लांबी, प्रवेश-निर्गमन बिंदू आणि खर्च अद्याप निश्चित झालेले नाहीत.
मात्र, या महत्त्वाकांक्षी योजनेसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. जमीन संपादन, भौगोलिक अडथळे, पर्यावरणीय परिणाम, प्रचंड बांधकाम खर्च आणि विविध सरकारी यंत्रणांमधील समन्वय ही आव्हाने सहज पार होणारी नाहीत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या वृत्तांतांत भोसरी–उंड्री मार्ग ३६ किलोमीटरचा (त्यातील १० किलोमीटर उन्नत मार्ग) आणि रामनदी–राजाराम पूल मार्ग आठ किलोमीटरचा असल्याचे नमूद झाले आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या २३ किलोमीटरच्या आराखड्याची अंतिम आखणी स्पष्ट होणे गरजेचे आहे.
पुण्याला बोगदे हवेत, हे खरे; पण केवळ बोगदे खोदून वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार नाही. सार्वजनिक वाहतूक, मेट्रो, बससेवा आणि रस्त्यांचे नियोजन एकत्रित करावे लागेल. अन्यथा जमिनीखाली कोट्यवधी रुपये खर्च होतील आणि जमिनीवर पुणेकर मात्र सिग्नलवरच अडकून राहतील!
