भावी पिढीला ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून वाचण्यासाठी ‘ग्रीन सोसायटी’चाच पर्याय – अजित गव्हाणे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑक्टोबर । पिंपरी । सध्या संपूर्ण जगावर ग्लोबल वॉर्मिंगचे सावट आहे. जागतिक तापमानवाढीवर पर्यावरणपूरक उपाययोजनाच प्रभावी ठरू शकतात. त्याची सुरुवात सजग नागरिकांनी स्वतःच्या सोसायट्यांमधूनच करायला हवी. भावी पिढीला सुसह्य वातावरण आणि स्वच्छ पर्यावरण देण्यासाठी ‘ग्रीन सोसायटी’ची संकल्पना अंमलात आणावी लागेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मोशी येथे व्यक्त केले.

डी. आर. गव्हाणे डेस्टिनेशन्स आणि रोटरी ग्रीन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी आणि पर्यायाने ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टाळण्यासाठी हाऊसिंग सोसायट्यांसाठी जनजागृतीपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मोशी येथील भारत माता चौक येथील जय गणेश लॉन्स येथे रविवारी (दि. 29) हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी मेळाव्याला व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी डीस्ट्रिक 3131 चे केशव ताम्हणकर, को डायरेक्टर रो. संतोष जोशी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कविताताई अल्हाट, विक्रांत लांडे, श्याम लांडे, पंकज भालेकर, संजय नेवाळे, राहुल भोसले, विनया तापकीर, वसंत बोराटे, विनायक रणसुभे, प्रदीप तापकीर, विकास साने, चंद्रकांत वाळके, मयुर कलाटे, मंदा आल्हाट, विजय लोखंडे, प्रकाश सोमवंशी, माया बारणे, अतिष बारणे, विशाल आहेर गिरिष ब्रम्हे आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी भोसरी, मोशी परिसरातील विविध 500 पेक्षा अधिक सोसायटीच्या नागरिकांची उपस्थिती होती. पाणी आणि विजेची बचत करणे तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. सोसायटीमधील पाण्याचा अपव्यय कमी करणे, सोसायटयांना सोलर हीटर किंवा सोलर लाइट्ससाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, सोसायटीमधील ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे कमी खर्चामध्ये विघटन करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे रोटरीयन केशव ताम्हणकर यांनी सांगितले. सेतू प्रकल्पांतर्गत आपल्या सोसायट्यांमध्ये कमी खर्चात पर्यावरणपूरक गोष्टी कशा राबवता येतील यावर या मेळाव्यात चर्चा झाली.

पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी व्हिडिओद्वारे प्रसारित संदेशात म्हटले की, कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्याचे खत आणि सुक्या कचऱ्याचे रिसायकलिंग करण्याचा प्रयत्न सोसायट्यांमधून केला जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्यावतीने ‘कूल रुम पॉलिसी’ राबविण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा ‘वापरा आणि फेका’ ऐवजी ‘वापरा आणि पुन्हा वापरा’ असे करण्यावर भर देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

ऑस्टिया जी अँड के या सोसायटीचे मस्जिद शेख यांनी सोलर सिस्टीमचा वापर कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. तर अमिता देशपांडे यांनी ‘इकॉलॉजीकल सोसायटी’ वर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.

भावी पिढीला स्वच्छ पर्यावरण देण्यासाठी समाजकारणावर !

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मेळाव्यात आपली भूमिका मांडताना राजकारणाबरोबरच समाजकारणावर आपला नेहमीच भर असल्याची ग्वाही दिली. ग्लोबल वॉर्मिंगपासून विशेषतः भावी पिढीला वीज, पाणी याच्या कमतरतेचा मोठा धोका उद्भवू शकतो. त्यांना स्वच्छ पर्यावरण, शुद्ध हवा, स्वच्छ पाणी मिळवून देणं हे आपले कर्तव्य आहे. याची सुरुवात स्वतःपासून, आपल्या सोसायटीपासून करायला हवी. सोसायट्यांमधून जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात भोसरी, मोशी परिसरातील 500 पेक्षा अधिक सोसायट्यांच्या सहभागामुळे निश्चितच पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलले गेल्याचे गव्हाणे म्हणाले. यापुढेही समाजाच्या भल्यासाठी आपण कामं करत राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *