“मी मनोज जरांगेंना विनंती केली आहे की…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. 25 जानेवारी ।। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मुंबई व आसपासच्या भागात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीपर्यंत मराठा आरक्षणाचा मोर्चा घेऊन आले असून शुक्रवारी ते मुंबईत दाखल होणार आहेत. एकीकडे मुंबई पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली असताना दुसरीकडे त्यांनी मात्र मागणी मान्य न झाल्यास मुंबईत येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? याविषयी चर्चा सुरू झाली असून त्याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांनी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेविषयी विचारणा केली असता त्यांनी त्यावर सरकारच्या आधीच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. “मराठा आरक्षण सरकार देणार आहे. सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही तीच होती. ओबीसी वगैरे अशा इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाणार आहे. त्या बाबतीत मागावसर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करतोय. १ लाख ४० हजार लोक ३ शिफ्टमध्ये काम करत आहेत. सर्वेक्षणाचं काम वेगाने चालू आहे. ज्या कुणबी नोंदी सापडतायत, त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम चालू आहे. विविध योजना देण्याचंही काम चालू आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

एकनाथ शिंदेंचं जरांगे पाटलांना आवाहन
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केलं आहे. “मनोज जरांगे पाटील यांना मी विनंती केली आहे की सरकार पूर्ण सकारात्मक आहे. आरक्षण देण्यासाठी सरकार काम करत आहे. विविध फायदे देत आहे. फक्त आश्वासन न देता ज्या सुविधा ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला देणं आहे, त्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांना मी आवाहन केलंय की जर सरकार सकारात्मक नसेल, तर आंदोलन ठीक आहे. सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे”, असं एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *