महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२७ डिसेंबर ।। ते वर्ष होते 2004. तेव्हा दिल्लीत कडक उन्हाळ्याचे दिवस होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. सगळीकडे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पंतप्रधान होणार अशी चर्चा होती. त्याविरोधात भाजपने आणि विशेषत: सुषमा स्वराज यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. 60 वर्षांनंतर पुन्हा परदेशी व्यक्तीकडे भारताच्या सर्वोच्चपदाची धुरा गेली तर मी माझ्या केसांचं मुंडण करेन, पायात चप्पल घालणार नाही, केवळ पांढरी साडी घालेन, जमिनीवरच झोपेन आणि चणे खाऊन जगेन, असा इशारा स्वराज यांनी दिला होता. भाजपच्या विरोधाला काँग्रेस नेत्यांनी एवढं गांभीर्याने घेतलं नाही. सोनिया गांधी मित्र पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत होत्या. आघाडीचे सरकार कसे स्थापन करता येईल, यासाठी त्या वेगवेगळ्या पक्षांची मोट बांधत होत्या. मात्र, एका प्रसंगानंतर सोनिया यांनी आपण पंतप्रधान होणार नसल्याचा निर्णय घेतला. 17 मे 2004 चा तो दिवस होता.
दिल्लीतील सोनिया गांधी यांचे सरकारी निवास्थान 10 जनपथ इथे दुपारी एक प्रसंग घडला. त्यानंतर सरकारच्या नेतृत्वात अचानक बदल करण्यात आला. त्यादिवशी मनमोहन सिंग यांना शोधत नटवर सिंग 10 जनपथ येथे पोहोचले होते. 10 जनपथ सोनिया गांधीच्या शासकीय बंगल्यातील हॉलमधल्या सोफ्यांवर सोनिया गांधी, प्रियांका गांधी, मनमोहन सिंग आणि सुमन दुबे असे चौघे बसले होते. तेवढ्यात राहुल गांधी तिथे आले आणि सगळ्यांदेखत सोनिया यांना उद्देशून म्हणाले, आई, मी तुला पंतप्रधान होऊ देणार नाही. माझ्या वडिलांची हत्या झाली. माझ्या आजीची हत्या झाली. तू पंतप्रधान झाली तर पुढच्या सहा महिन्यांत तुझीही हत्या होऊ शकते. त्यावेळी सोनिया गांधींच्या चेहर्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती.
राहुल गांधी यांनी सोनिया यांना 24 तासांचा वेळ दिला. आपलं म्हणणं ऐकलं नाही तर मी टोकाचं पाऊल उचलेन, असं राहुल यांनी म्हटलं आणि तिथून निघून गेले. त्यानंतर सोनियांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं आणि हॉलमध्ये शांतता होती. पुढचे 15-20 मिनिटे कुणीच काही बोलले नाही. दरम्यान नटवर सिंग यांनी सोनिया यांना आतल्या खोलीत जा. आम्ही पुढच्या गोष्टी बघून घेऊ, असे म्हटले. राहुल गांधींच्या टोकाच्या इशार्यामुळे सोनिया यांनी पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेतला, असे नटवर सिंग सांगतात. एक आई म्हणून सोनिया यांना आपल्या मुलाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करणे कठीण झाले होते. त्याच दिवशी (17 मे 2004) सोनिया गांधी यांनी 10 जनपथ येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. राहुल यांच्यासोबतच्या त्या प्रसंगानंतर सोनिया गांधी जड अंत:करणाने बैठकीस गेल्या. त्यांच्यासोबत नटवर सिंग, मनमोहन सिंग दोघेही गेले. बैठकीत प्रणव मुखर्जी, शिवराज पाटील, गुलाम नबी आझाद, एम.एल. फोतेदार, अहमद पटेल आणि इतर नेते होते. त्यानंतर सोनिया गांधींनी येताच क्षणी पुढील पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग असतील अशी घोषणा केली. त्यानंतर लगेच सगळीकडे शांतता पसरली.
…अन् दुसर्या दिवशी अधिकृत घोषणा
डॉ. सिंग म्हणाले, मॅडम, तुम्ही दिलेल्या ऑफरबद्दल मी आभारी आहे. मात्र, माझ्याकडे बहुमत नसल्याने मी ते स्वीकारू शकत नाही. तेवढ्यात नटवर सिंग यांनी हस्तक्षेप केला. डॉ. सिंग यांना नकार देण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण ज्या व्यक्तीकडे बहुमत आहे. त्यांनी ते तुम्हाला देऊ केले आहे. दुसर्याच दिवशी म्हणजे 18 मे 2004 रोजी सोनिया गांधी आणि डॉ. सिंग यांनी तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांची भेट घेतली. अर्थात, डॉ. सिंग यांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा दुसर्या दिवशी करण्यात आली.