महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १० फेब्रुवारी २०२६ || मध्य पूर्वेत पुन्हा एकदा बारुदाचा वास दरवळू लागला आहे. वॉशिंग्टनच्या हालचाली आणि पर्शियन आखातातील हालचाली पाहता, “कधीही काहीही होऊ शकतं” अशी स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा आक्रमक, तर लष्करी हालचाली त्याहून अधिक ठळक दिसत आहेत. इराणवर थेट हल्ला होणार का, हा प्रश्न आता केवळ चर्चेपुरता राहिलेला नाही, तर तो धोरणात्मक पातळीवर गंभीरपणे मांडला जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी अमेरिकेने जारी केलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे ही केवळ खबरदारी नसून, संभाव्य संघर्षाची पूर्वतयारी असल्याचं चित्र निर्माण करत आहेत. जगातील तेलपुरवठ्याची नाडी असलेल्या या मार्गावर अमेरिकन जहाजांना ‘इराणी हद्दीपासून दूर राहा’ असा सल्ला देणं म्हणजे, धोक्याची जाणीव करून देणं नव्हे, तर धोक्याची घोषणा करण्यासारखंच आहे.
अमेरिकन सागरी प्रशासनानं दिलेल्या सूचनांमध्ये एक विचित्र विरोधाभास दिसतो. एकीकडे, इराणी सैन्यानं जहाज अडवण्याचा प्रयत्न केल्यास सशस्त्र प्रतिकार करू नये, असं सांगितलं जातं; तर दुसरीकडे, याचा अर्थ इराणच्या कारवाईला संमती आहे, असं नाही, हेही ठामपणे नमूद केलं जातं. म्हणजेच, “गोळी झाडू नका, पण युद्धासाठी सज्ज रहा” असा हा दुहेरी संदेश आहे. याच दरम्यान अमेरिकेनं आपल्या नागरिकांसाठी अत्यंत कडक ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केली आहे. इराणमधील नागरिकांना सरकारी मदतीची वाट न पाहता स्वतःहून देश सोडण्याचा सल्ला देणं, हे साधं पाऊल नाही. इतिहास पाहिला, तर अशा इशाऱ्यांनंतरच अनेकदा रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या सूचनांकडे केवळ खबरदारी म्हणून पाहणं भोळसटपणाच ठरेल.
या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणच्या दिशेने युद्धनौकांचा ताफा रवाना केल्याची माहिती समोर आली आहे. विमानवाहू युद्धनौका, लढाऊ विमाने आणि हजारो सैनिकांची तैनाती म्हणजे “दबावाचं राजकारण” की “युद्धाची नांदी”, हा प्रश्न आता उघड आहे. एकीकडे अणु करारासाठी इराणवर दबाव वाढवायचा आणि दुसरीकडे लष्करी ताकद दाखवायची—हा खेळ धोकादायक वळणावर पोहोचतोय. मध्य पूर्वेत आधीच अस्थिरता आहे; त्यात अमेरिका-इराण संघर्ष पेटला, तर त्याचे पडसाद केवळ त्या भागापुरते मर्यादित राहणार नाहीत. तेलाच्या किमतींपासून जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत सगळीकडे त्याची धग जाणवेल. त्यामुळे सध्या जग एका अशा टप्प्यावर उभं आहे, जिथं एक आदेश, एक चूक किंवा एक चुकीचा अंदाज इतिहास बदलू शकतो—आणि हीच खरी भीती आहे.
