महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ मे २०२६ ।। West Bengal Election 2026 BJP Victory: पश्चिम बंगालच्या राजकारणात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही धुरळा खाली बसलेला नाही. भाजपाने पहिल्यांदाच सत्ता हस्तगत करत इतिहास घडवला असला, तरी या विजयामागे मतदार याद्यांमधील मोठ्या प्रमाणावर नावं वगळल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने करत राजकीय वातावरण अधिक तापवले आहे. तब्बल ९० लाख मतदारांची नावं ‘एसआयआर’ प्रक्रियेतून हटवण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने केला असून, “हा विजय मतपेटीतला की मतदारयादीतला?” असा सवाल आता बंगालच्या राजकारणात घुमू लागला आहे. निवडणुकीपूर्वीच या प्रक्रियेवरून वाद पेटला होता; पण निकालानंतर तृणमूलच्या आरोपांना अधिक धार आली आहे. विशेषतः २०२१ मध्ये तृणमूलने जिंकलेल्या अनेक जागा यावेळी भाजपाकडे गेल्याने संशयाचे ढग अधिक गडद झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि वरिष्ठ वकील कल्याण बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडलेला दावा आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यांच्या मते, ३१ मतदारसंघांमध्ये ज्या प्रमाणात मतदारांची नावं वगळण्यात आली, ती संख्या २०२१ मधील विजयाच्या मतांपेक्षा अधिक होती. काही ठिकाणी तर ती जवळपास समान असल्याचेही त्यांनी नमूद केले. म्हणजेच, मतदार याद्यांतील कपातीचा थेट परिणाम निकालावर झाला, असा तृणमूलचा दावा आहे. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेही काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. ज्या मतदारसंघांत विजय-पराभवातील अंतर कमी आहे आणि मतदारयादीतून वगळलेल्या मतदारांच्या अपीलांचा निकाल बाकी आहे, अशा प्रकरणांत संबंधित उमेदवारांना याचिका दाखल करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. “शंकास्पद वगळलेल्या मतांपेक्षा विजयाचे अंतर कमी असेल, तर त्या प्रकरणांची तपासणी होईल,” या निरीक्षणामुळे या वादाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेवर वेळकाढूपणाचाही आरोप होत आहे. ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी न्यायालयात सांगितले की, मतदार नोंदणी आणि नाव वगळण्यासंदर्भातील अपील निकाली काढण्यासाठी सध्याच्या गतीने तब्बल चार वर्षे लागू शकतात. म्हणजे निवडणूक संपली, सरकारही स्थापन झाले; पण वाद मात्र संपण्याची चिन्हे नाहीत. तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे की, ३५ लाख मतदारांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत आणि भाजपाच्या विजयात या प्रक्रियेचा मोठा वाटा आहे. दुसरीकडे भाजपाने हे आरोप फेटाळून लावत जनतेने बदलासाठी मतदान केल्याचा दावा केला आहे. मात्र बंगालमध्ये आता राजकारण फक्त मतांवर नाही, तर मतदारांच्या अस्तित्वावरच येऊन ठेपल्याचे चित्र दिसत आहे.
