चांदी पुन्हा महागली; तरी उच्चांकापेक्षा मोठी स्वस्त!

Spread the love

Loading

पाच दिवसांत चांदी १३ हजारांनी महाग; सोन्यानेही घेतली ८,६०९ रुपयांची झेप, खरेदीदारांची पुन्हा धाकधूक

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट २०२६ ।। सोनं-चांदीच्या बाजारात स्थिरता नावाची गोष्ट उरली आहे की नाही, असा प्रश्न आता खरेदीदारांना पडू लागला आहे. कधी भाव आभाळाला भिडतात, तर कधी काही दिवसांत हजारो रुपयांची घसरण होते. गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांत मात्र चांदीने पुन्हा जोरदार उसळी घेतली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ३१ जुलैला एक किलो चांदीचा भाव २ लाख १८ हजार २९५ रुपये होता. शुक्रवारी तो २ लाख ३१ हजार ३८१ रुपयांवर पोहोचला. म्हणजे अवघ्या पाच दिवसांत चांदी किलोमागे १३ हजार ८६ रुपयांनी महागली. मात्र, ही तेजी पाहून चांदीने पुन्हा जुना विक्रम मोडला, असे समजण्याचे कारण नाही.

कारण चांदी अजूनही तिच्या ऐतिहासिक उच्चांकापासून तब्बल १ लाख ८८ हजार २४४ रुपये खाली आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी MCXवर चांदीने पहिल्यांदाच चार लाखांचा टप्पा ओलांडत ४ लाख २० हजार ४८ रुपये प्रति किलो असा विक्रमी भाव गाठला होता. त्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली. आता पुन्हा भाव वाढत असले तरी त्या विक्रमी पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी चांदीला अजून मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. त्यामुळे सध्याची तेजी म्हणजे विक्रमी दराची पुनरावृत्ती नसून, आधीच्या मोठ्या घसरणीनंतर झालेली जोरदार सुधारणा आहे.

सोन्यानेही या बाजारातील तेजीला साथ दिली आहे. MCXवर २४ कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा भाव ३१ जुलैला १ लाख ४३ हजार ३७६ रुपये होता. गेल्या शुक्रवारी तो १ लाख ५१ हजार ९८५ रुपयांवर बंद झाला. म्हणजे पाच दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ८ हजार ६०९ रुपयांची वाढ झाली. देशांतर्गत बाजारातही २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ८६० रुपयांवरून १ लाख ४९ हजार ६२१ रुपये झाला. म्हणजेच येथेही तोळ्यामागे ६ हजार ७६१ रुपयांची वाढ झाली आहे. सोने आता दीड लाखांच्या उंबरठ्यावर उभे असल्याने आगामी सणासुदीत ग्राहकांचे बजेट पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत बाजारातील ताज्या दरांनुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४९ हजार ६२१ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४६ हजार ३० रुपये आहे. २० कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३३ हजार १६० रुपये, १८ कॅरेटचा १ लाख २१ हजार १९० रुपये, तर १४ कॅरेट सोन्याचा दर ९६ हजार ५१० रुपये इतका आहे. मात्र, हे दर बाजारानुसार बदलू शकतात आणि प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना त्यावर जीएसटी, मेकिंग चार्जेस व इतर शुल्क लागू होतात. त्यामुळे भाव पाहून ‘आजच खरेदी’ करण्यापूर्वी अंतिम बिल किती येणार, हे पाहणे अधिक शहाणपणाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *