![]()
किंमत वाढली नाही तरी पॅकेटमधील माल कमी होणार; साखर, पामतेल आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाचा ग्राहकांना फटका
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट २०२६ ।। महागाईचा राक्षस काही केल्या घराबाहेर जाण्याचे नाव घेत नाही. किराणा दुकानात महिन्याचा सामानाचा हिशेब करताना ग्राहकाच्या खिशाला आधीच घाम फुटत असताना आता सप्टेंबर तिमाहीत रोजच्या वापरातील वस्तू आणखी महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साबण, बिस्किटे, पर्सनल केअर उत्पादने, खाद्यपदार्थ अशा एफएमसीजी वस्तूंच्या किमती वाढवण्याच्या तयारीत कंपन्या आहेत. वाढत्या कच्च्या मालाच्या किमती आणि नफ्यावर येणारा दबाव यामुळे सप्टेंबर तिमाहीत कंपन्या निवडक उत्पादनांवर टप्प्याटप्प्याने दरवाढ करू शकतात. उद्योगातील ताज्या माहितीनुसार, मागणी मजबूत असल्याने कंपन्यांना किंमत वाढवूनही बाजार फारसा कोसळणार नाही, असा विश्वास आहे.
पण महागाईची गंमत अशी की ती नेहमी सरळ दरवाजातून येत नाही; कधी पॅकेट लहान करूनही येते. यालाच ‘श्रिंकफ्लेशन’ म्हणतात. म्हणजे दुकानात दहा रुपयांचे बिस्किटाचे पाकीट दहा रुपयांनाच दिसेल; मात्र त्यातील बिस्किटांचे वजन किंवा संख्या कमी झालेली असेल. विशेषतः ₹५ आणि ₹१०च्या छोट्या पॅकवर कंपन्या हा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे. ब्रिटानियाने सप्टेंबर तिमाहीत आणखी १.५ ते २ टक्के किंमतवाढीचे संकेत दिले असून, छोट्या पॅकची किंमत ग्राहकांच्या मानसिक मर्यादेपलीकडे जाऊ नये म्हणून प्रमाण कमी करण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो.
साखर, पामतेल, इंधन आणि पॅकेजिंगचा वाढता खर्च हा या सगळ्या गणिताचा केंद्रबिंदू आहे. साखरेच्या किमती तर अलीकडेच महिनाभरात सुमारे १० टक्क्यांनी वाढून विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सणासुदीच्या काळात मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने या किमती काही काळ चढ्याच राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे क्रूडच्या दरातील चढ-उतारामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्चावरही परिणाम होतो. त्यामुळे कंपन्या एकदम मोठी दरवाढ करण्याऐवजी थोडी किंमत वाढवणे, सवलती कमी करणे किंवा पॅकेटचे वजन घटवणे असे मार्ग अवलंबताना दिसत आहेत.
ग्राहकांसाठी खरा धक्का इथेच आहे. कारण महागाईचा परिणाम केवळ एखाद्या महागड्या वस्तूवर होत नाही; रोजच्या किराण्यातील दहा-दहा रुपयांच्या छोट्या फरकातून महिन्याचा खर्च मोठा होतो. साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, खाद्यतेल, चहा-कॉफी, डिटर्जंट आणि पॅकबंद खाद्यपदार्थ यापैकी प्रत्येक वस्तूवर थोडी वाढ झाली तरी महिन्याच्या बजेटचे गणित बिघडू शकते. मात्र सप्टेंबरपासून सर्वच वस्तू ठरावीक टक्क्याने महागणार, असे चित्र अद्याप नाही. कंपन्या कच्च्या मालाचे दर, क्रूड, मान्सून आणि जागतिक परिस्थितीचा अंदाज घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. म्हणजेच महागाईची घंटा वाजली आहे; आता ती किती जोरात वाजणार, हे सप्टेंबरमध्ये स्पष्ट होईल.
