Heat Wave : विदर्भात सूर्याचा कहर; जनजीवन पूर्णपणे होरपळलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ मे २०२६ ।। विदर्भात सध्या आकाशातला सूर्य जणू आग ओकत उभा आहे आणि त्याच्या ज्वाळांनी संपूर्ण जनजीवन अक्षरशः भाजून निघत आहे. तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडताच उष्णतेची लाट आता थेट जीवघेणी ठरू लागली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात शेतात काम करणाऱ्या एका तरुण शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने विदर्भ हादरून गेला आहे. शिरसोली येथील ३० वर्षीय श्याम इंगळे हे उन्हाच्या तडाख्यात काम करत असताना अचानक कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. “उन्हाने माणूस भाजून निघतोय” हे वाक्य आता केवळ म्हण राहिलेली नसून विदर्भात ते वास्तव बनताना दिसत आहे. उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ३५० च्या पुढे गेल्याने आरोग्य यंत्रणेलाही घाम फुटला आहे.

एकट्या अकोला जिल्ह्यात तब्बल ३२३ उष्माघात रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर गेले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने विशेष उपचार कक्ष सुरू करण्यात आले असून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी २४ तास सज्ज ठेवण्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये १३० हून अधिक खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातही परिस्थिती चिंताजनक बनू लागली असून तेथेही उष्णतेचा फटका बसलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या भीषण परिस्थितीची दखल घेत अकोला प्रशासनाने दुपारी १२ ते ५ या वेळेत शहरातील ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वाहनचालकांना उन्हात सिग्नलवर थांबावे लागू नये. उन्हाचा कहर इतका वाढला आहे की, आता प्रशासनालाही नियम बदलावे लागत आहेत.

हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानाचा पारा ४८ अंशांपर्यंत पोहोचू शकतो, असा इशारा दिल्याने भीती आणखी वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा, सुती कपडे वापरण्याचा आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः शेतमजूर आणि बांधकाम कामगारांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण विदर्भात उन्हाची ही लाट आता केवळ अस्वस्थ करणारी राहिलेली नाही, तर ती थेट जीव घेणारी ठरत आहे. एकीकडे जमिनीवर भेगा पडत आहेत, तर दुसरीकडे माणसांच्या शरीरातील पाण्याचा थेंबही उन्हाने खेचून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातल्या या तापलेल्या उन्हाने आता प्रशासन, डॉक्टर आणि सामान्य नागरिक सगळ्यांनाच सावधतेचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *