दहावी- बारावी अभ्यासक्रमात नवे विषय? परीक्षांआधी समोर आली मोठी बातमी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ फेब्रुवारी ।। बदलत्या काळानुरुप शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्येही काही अमूलाग्र बदल करण्यात येतात. असेच बदल इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्येही करण्यात येणार असून, त्यासंबंधीचा प्रस्तावही पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असताना आता नेमका कोणता नवा बदल होणार? असाच चिंता वाढवणारा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर लक्षात घ्या हा बदल सीबीएसई अभ्यासक्रमांमध्ये पाहता येणार आहे.

केंद्रीय माध्यमित शिक्षण मंडळ अर्थात CBSE च्या वतीनं आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहेत. ज्याअंतर्गत इयत्ता दहावीपर्यंत दोन ऐवजी तीन भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य करण्याचा निर्णय झाला आहे. या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय असली. पुढे इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी विद्यार्थ्यांना एकऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. ज्यामध्ये एका भारतीय भाषेचा समावेश असेल, असं सीबीएसईच्या प्रस्तावात म्हटलं गेलं आहे.

का घेण्यात आला हा निर्णय?
भारतीय भाषांमधील शिक्षणाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय CBSE च्या वतीनं घेण्यात आला आहे. विविध शैक्षणिक संस्थांकडून सूचना मागवल्यानंतर हा बदल लागू करण्यात येईल. दरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरणाला केंद्रस्थानी ठेवतच हे बदल करण्यात येत असल्याचं शिक्षण मंडळाच्या प्रस्तावात म्हटलं गेलं आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आता किती विषय?
इयत्ता नववी आणि दहावीच्या स्तरावर उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा विषयांचा अभ्यासक्रम लागू असेल. ज्यामध्ये सात मुख्य विषय आणि तीन भाषांचा समावेश असेल (दोन भारतीय भाषा). या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये गणित, संगणक, सामाजिक शास्त्र, कला शिक्षण, विज्ञान, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षणाचा समावेश असेल.

अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये दोन भाषांसह चार मुख्य विषयांचा समावेश असेल. ज्यामध्ये दोन भाषांपैकी एक भाषा भारतीय असावी. बारावीच्या अभ्यासक्रमांची विभागणी चार गटांमध्ये करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *