राज्यातील सर्व माध्यमांतील चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलली; आता …….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ फेब्रुवारी ।। राज्यातल्या सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची (Shcool Timing) सूचना राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. राज्यपालांच्या सूचनेला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला होता. राज्यात बहुतांश शाळा सकाळी सात वाजताच्या आसपास भरतात. ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल तसंच पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत होती. याला राज्याच्या शिक्षक विभागाने (Maharashtra Education Department) प्रतिसाद दिला आहे.


राज्यातल्या चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळांची वेळ बदलण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी 9 वाजता भरणार आहेत. सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक (GR) राज्य सरकारने काढलंय. राज्यपालांनीही शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती मुलांची झोप होत नसल्याने शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत होती.. अखेर राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतलाय..

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात 5 डिसेंबर 2023 ला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी भाषणादरम्यान राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती.यावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसंच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय आणि विविध शिक्षण तज्ज्ञ तसंच शिक्षण प्रेमी आणि पालक यांच्याशी चर्चा करण्यात आली. यात काही गोष्टी समोर आल्या.

यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा.

या सूचनांचा विचार करुन राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 वाजण्याच्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *