ICC ची मोठी घोषणा… T20 वर्ल्ड कपपासून लागू होणार नवीन नियम! दोन ओव्हरमध्ये फक्त…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मार्च ।। टी-२० व एकदिवसीय या क्रिकेटच्या दोन प्रकारांमध्ये आता वेळेचे बंधन कायमस्वरूपी असणार आहे. एक षटक संपल्यानंतर ६० सेकंद होण्याच्या आतमध्ये दुसरे षटक सुरू होणे अनिवार्य असणार आहे. जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकापासून नवा नियम कायस्वरूपी लागू होणार आहे. आयसीसीच्या बैठकीत शुक्रवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याआधी हा नियम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता.

आयसीसीकडून याबाबत स्पष्ट करण्यात आले की, डिसेंबर २०२३ पासून वेळेच्या बंधनाच्या नियमाला प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली होती. या नियमाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फायदा झाला. एकदिवसीय क्रिकेटच्या एका सामन्यात तब्बल २० मिनिटे वाचली. त्यामुळे आगामी टी-२० विश्‍वकरंडकापासून हा नियम आता कायमस्वरूपी करण्यात येणार आहे.

पाच धावांचा दंड
आयसीसीच्या नव्या नियमानुसार गोलंदाजी करीत असलेल्या संघाने षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत दुसऱ्या षटकाला सुरुवात करायला हवी. पंचांकडून गोलंदाजी करीत असलेल्या संघाला दोन वेळा इशारा देण्यात येईल. एका डावामध्ये तीन वेळा ६० सेकंदांची मर्यादा ओलांडल्यास क्षेत्ररक्षण करीत असलेल्या संघाला पाच धावांचा दंड सुनावण्यात येणार आहे.

अशा घटनांसाठी सूट
आयसीसीकडून काही घटनांसाठी या नवीन नियमापासून सूट देण्यात आली आहे. नवा फलंदाज खेळपट्टीवर आल्यास, ड्रिंकसाठी ब्रेक घेतल्यास, खेळाडूला दुखापत झाल्यास अशा घटनांमध्ये वेळेचे बंधन ग्राह्य धरले जाणार नाही. आयसीसीकडून याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *