पुण्यात एनआयएची मोठी कारवाई : दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत जप्त

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मार्च ।। मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत जप्त केली.

एनआयएने मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली.


मोहम्मद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता. २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले. त्यानंतर त्याला तपासासाठी एनआयएच्या ताब्यात देण्यात आले. दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील एका वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते.

कोंढव्यात त्यांनी बाँम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाँम्बस्फोट केले होते. त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर एनआयएच्या पथकाने कोंढव्यातील मीठानगर परिसरातील इमारत जप्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *