AUS vs IND Test Schedule: मोठी बातमी; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ५ लढतीत डे-नाईट कसोटीचा समावेश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ मार्च ।भारतीय खेळाडू सध्या आयपीएलच्या १७व्या हंगामात खेळत आहेत. त्यानंतर टी-२० वर्ल्डकपचा थरार होणार आहे. आयपीएलच्या हंगामाला नुकतीच कुठे सुरुवात झाली असताना भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २०२४-२५ची ही कसोटी मालिका २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी ही घोषणा केली. दोन्ही संघातील ही मालिका ५ सामन्यांची असेल. पर्थनंतर एडिलेड, ब्रेसबन, मेलबर्न आणि सिडनी येथे कसोटी सामने होणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील पर्थ हे ठिकाण नवे असेल. या मैदानावर आतापर्यंत ४ कसोटी सामने झाले आहेत आणि सर्वच्या सर्व यजमान अर्थात ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. भारताच्या २०१८-१९ च्या दौऱ्यात येथे कसोटी मॅच झाली होती. २०२०-२१ च्या दौऱ्यात येथे कसोटी खेळवण्यात आली नव्हती.

दोन्ही संघातील दुसरी कसोटी ही डे-नाईट म्हणजे पिंक बॉलने खेळली जाणार आहे. ही कसोटी ६ डिसेंबरपासून एडिलेड येथे होईल. तिसरी कसोटी ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर होईल. याच मैदानावर भारताने गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडून काढला होता. चौथी कसोटी ही बॉक्सिंग डे कसोटी असेल जी मेलबर्न येथे खेळवली जाईल तर अखेरची कसोटी सिडनी येथे होणार आहे. भारताने सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियाच्या त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८-१९ साली ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. तर २०२०-२१ साली अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने २-१ असा विजय मिळवला होता.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. या दोन्ही संघात मर्यादीत षटकांचे सहा सामने आणि एकमेव कसोटी लढत होणार आहे. दोन्ही संघात प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका होईल.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

पहिली कसोटी- २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी- ६ ते १० डिसेंबर, एडिलेड
तिसरी कसोटी- १४ ते १८ डिसेंबर, ब्रिसबेन
चौथी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी- ३ ते ७ जानेवारी, सिडनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *