श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा मावळ भाजपचा निर्धार

Spread the love

कामशेत, 13 एप्रिल – देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम हातांमध्येच रहावे यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनाच तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मावळ तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.

गुरुदत्त मंगल कार्यालय कामशेत येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र भाजपचे प्रभारी व उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्ष यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शर्मा यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी बारणे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

*’महाविकास आघाडीला धडा शिकवा’*

अयोध्येतील राम मंदिर निर्माण कार्यास विरोध करणाऱ्यांना, 370 वे कलम हटविण्यास विरोध केला अशा काँग्रेस, शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीतून आपण हद्दपार करावे व विकसित भारतासाठी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना शर्मा यांनी केल्या.

मावळ विधानसभा कोअर कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत देखील शर्मा यांनी बैठक घेतली. मावळ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांशी समन्वय ठेऊन कार्य करण्याच्या सूचना दिल्या.

*’मावळातून किमान 50 हजारांचे मताधिक्य’*

बारणे यांना मावळ विधानसभा मतदारसंघातून 50 हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून देऊ, अशी ग्वाही निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी यावेळी दिली.

बैठकीस भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपा पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बुट्टे पाटील, मावळ लोकसभा समन्वयक सदाशिव खाडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख योगेश बाचल, मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय भाऊ गुंड , माजी सभापती गुलाब म्हाळसकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव रघुवीर शेलार, प्रदेश भाजपा निमंत्रित सदस्य जितेंद्र बोत्रे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण राक्षे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माळी, लोकसभा विस्तारक भूषण जोशी, विधानसभा विस्तारक, रवींद्र देशपांडे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष अशोक दाभाडे, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड, देहूरोड शहर भाजपा अध्यक्ष लहुमामा शेलार , युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, महिला मोर्चा अध्यक्षा सायली बोत्रे यांच्यासह मावळ विधानसभा मंडळ संघातील सर्व मंडळाचे सरचिटणीस सर्व सुपर वॉरियर्स,बूथ अध्यक्ष व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *