Rovman Powell : सुनील नारायणने सर्वांनाच ‘ब्लॉक’ केलेय ; टी-२० वर्ल्डकपसाठी संघात पाहिजे – रोवमन पॉवेल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। कोलकता : फलंदाजांना आकलन न होणारी शैली आणि स्वतः शतक करण्याची क्षमता अशी गुणवत्ता असलेल्या सुनील नारायणला आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेण्यासाठी त्यांचा कर्णधार रोवमन पॉवेल सर्व प्रयत्न करतोय; पण नारायण काही दाद लागू देत नाही.

आयपीएलमध्ये कोलकता संघाचा सर्वात हुकमी खेळाडू ठरत असलेल्या नारायणने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सलामीला खेळताना शतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत ४-०-३०-२ अशी कामगिरी केली. कोलकता संघाकडून त्याला यंदाही सलामीला पाठवण्यात येत आहे आणि त्यात तो यशस्वी होत आहे.

खरे तर वेस्ट इंडीज संघातून कधीच बाहेर गेलेल्या नारायणने आंतरराष्ट्रीय निवृत्ती स्वीकारली आहे; पण जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी नारायण वेस्ट इंडीज संघात असावा, यासाठी कर्णधार पॉवेल प्रयत्न करत आहे. मंगळवारी कोलकता आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात नारायण आणि पॉवेल आमनेसामने झाले होते.

नारायणशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत; परंतु त्याने सर्वांना ब्लॉक केले आहे. अशी खंत पॉवेलने उघडपणे बोलून दाखवली. पुढील महिन्यात ३६ वर्षांचा होत असलेला नारायण वेस्ट इंडीजकडून आपला अखेरचा ट्वेन्टी-२० सामना ऑगस्ट २०१९ मध्ये खेळला होता. जगभरात होत असलेल्या विविध ट्वेन्टी-२० लीगमध्ये मुक्तपणे खेळता यावे यासाठी नारायणने नोव्हेबर महिन्यात आंतरराष्ट्रीय निवृत्ती स्वीकारली आहे.

नारायणशी थेट संवाद साधण्यासाठी मी गेले १२ महिने प्रयत्न करतोय पण त्याने सर्वांना ब्लॉक केले आहे. त्यामुळे मी कायरन पोलार्ड, द्वेन ब्रावो, निकोरस पूरन यांनाही नारायणचे मत परिवर्तन करण्यास सांगितले आहे. विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवडीपर्यंत काही तरी चांगले घडेल, अशी आशा पॉवेलने व्यक्त केली.

वेस्ट इंडीजचे खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताना पहाणे नेहमीच आनंददायी असते, असे पॉवेल म्हणाला. मंगळवारच्या कोलकता संघाविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा संघ मागे पडत असताना याच पॉवेलने नारायणच्या एका षटकांत एक चौकार आणि दोन सलग षटकार मारले. डावातील १७ व्या षटकांत एकूण १६ धावा फटकावल्या त्यामुळे राजस्थानची गाडी रुळावर आली. त्यानंतर पुढच्या षटकात नारायणनेच पॉवेलला बाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *