रेल्वेचा मोठा निर्णय ; केवळ “या” प्रवाशांना मिळणार सवलत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या (Indian Railway) कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाच मिळते. कारण, रेल्वेच्या माध्यमातून कमी दरांत आरामदायी प्रवास करता येतो. आतापर्यंत भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं (Ministry of Railways) विविध प्रकारच्या प्रवाशांना अनेक सवलती (Railway Concession) दिल्या जात होत्या. आता या सवलती बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनापूर्वी रेल्वेकडून 53 श्रेणींमध्ये तिकिटांवर सूट दिली जात होती. मात्र, आता दिव्यांगांच्या केवळ चार श्रेणी आणि रुग्ण व विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींमध्येचं सवलत दिली जाणार आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रेल्वे मंत्री (Minister of Railways) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत (Loksabha) सवलती रद्द करण्याबाबत माहिती दिली होती. रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं होतं की, कोरोना महामारीमुळे रेल्वेने 20 मार्च 2020 रोजी अनेक सवलती बंद केल्या होत्या. अद्यापही ही बंदी कायम आहे. तूर्तात तरी सवलतींवरी ही बंदी हटवण्याचा विचार रेल्वे मंत्रालयानं केलेला नाही. या पूर्वी रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांनाही (Senior Citizens) रेल्वे तिकिटात सवलत दिली होती. मात्र, आता त्यावरही बंदी घालण्यात आली आहे. या सवलती रद्द करण्याच्या कारणांचीदेखील रेल्वेमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली होती.

– रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 16 मार्च रोजी लोकसभेत सांगितलं होतं की, प्रवाशांना विविध सवलती दिल्यानं रेल्वेवर मोठा आर्थिक भार पडतो. अगोदरच कोरोनामुळे रेल्वेच्या महसुलात (Railway Revenue) लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह इतर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींची व्याप्ती वाढवणं शक्य नाही.

– रेल्वेमंत्री वैष्णव यांनी डिसेंबर 2021 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2019-20 या वर्षात रेल्वेला तिकीट विक्रीतून 50 हजार 669 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता असं सांगितलं. 2020-21 मध्ये त्यात मोठी घट झाली. या वर्षी रेल्वेला फक्त 15 हजार 248 कोटी रुपये महसूल मिळाला होता. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 2021-22 मध्ये सप्टेंबरपर्यंत रेल्वेला 15 हजार 434 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

– चालू वर्षी फेब्रुवारीमध्ये वैष्णव यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे तिकिटांवरील सवलतींमुळे 2018-19 या कालावधीत रेल्वेला एक हजार 995 कोटी रुपयांचा तोटा झाला. 2019-20 मध्ये हा तोटा वाढून दोन हजार 59 कोटी रुपयांपर्यंत गेला. त्यानंतर कोरोनामुळे सर्व सवलती बंद केल्या गेल्या होत्या. सवलती बंद केल्यामुळे 2020-21 या वर्षात रेल्वेला केवळ 38 कोटी रुपयांचा तोटा झाला. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रेल्वेनं अनेक कोट्यांतील सवलती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘या’ लोकांना दिल्या जाणाऱ्या सवलती आता बंद झाल्या आहेत

1) ज्येष्ठ नागरिक : 60 वर्षांवरील पुरुषांना रेल्वे भाड्यात मिळणारी 40 टक्के आणि 58 वर्षांवरील महिलांना मिळणारी 50 टक्के सवलत आता बंद झाली आहे.

2) पुरस्कारार्थी : राष्ट्रपती पोलीस पदक आणि भारतीय पोलीस पुरस्कार विजेत्यांना 60 वर्षांनंतर भाड्यात सवलत मिळत होती. पुरुषांना 50 टक्के आणि महिलांना 60 टक्के सूट मिळायची. श्रम पुरस्कार विजेत्यांना 75 टक्के, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना (National Award Winners) आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्यांना 50 टक्के सूट दिली जात होती.

3) युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या विधवा : दहशतवादी किंवा अतिरेकी हल्ल्यांमध्ये हुतात्मा झालेल्या पोलीस किंवा निमलष्करी दलातील जवानांच्या पत्नीला सेकंड क्लास आणि स्लिपरमध्ये 75 टक्के सूट दिली जात असे. कारगिल युद्ध आणि श्रीलंकेतील कारवाईत हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या पत्नीलाही याच प्रमाणात सूट मिळत होती.

4) विद्यार्थी : घरी किंवा शैक्षणिक दौऱ्यावर जाणार्‍या विद्यार्थ्यांना 50 ते 75 टक्के सवलत मिळायची. ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वर्षातून एकदा शैक्षणिक दौऱ्यावर जाण्यासाठी सेकंड क्लास तिकिटावर 75 टक्के सवलत मिळत असे. यूपीएससी (UPSC) किंवा एसएससी (SSC) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सेकंड क्लास तिकीटावर 50 टक्के सूट मिळत असे. 35 वय वर्षापर्यंतचे स्कॉलर, भारत सरकारच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही सेकंड क्लास आणि स्लिपर क्लासच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत दिली जात होती.

5) तरुण : राष्ट्रीय युवा प्रकल्प आणि मानव उत्थान समितीच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांना 40 ते 50 टक्के सवलत मिळत असे. केंद्र किंवा राज्य सरकारी नोकऱ्यांच्या मुलाखतीसाठी जाणाऱ्या तरुणांना 50 ते 100 टक्के सूट दिली जात होती. स्काउटिंग ड्युटीसाठी जाणाऱ्या स्काउट आणि गाईड्सना सेकंड आणि स्लीपर क्लास तिकीटांवर 50 टक्के सूट मिळत असे.

6) शेतकरी : कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शेतकर्‍यांना (Farmers) सेकंड व स्लीपर क्लासमध्ये 25 टक्के तिकीट सवलत मिळ असे. सरकारच्या विशेष गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांना 33 टक्के सवलत मिळायची. शेती किंवा दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्थांना भेट देणाऱ्या शेतकरी प्रवाशांना सेकंड आणि स्लीपर क्लासच्या तिकिटांवर 50 टक्के सूट मिळायची.

7) कलाकार आणि खेळाडू : परफॉर्मन्ससाठी जाणारे कलाकार (Artists) आणि चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ यांना 50 ते 75 टक्के सूट दिली जात असे. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंनाही (Players) 50 ते 75 टक्के सवलत मिळत असे.

8) पत्रकार : केंद्र किंवा राज्य सरकारची मान्यता असलेल्या पत्रकारांना प्रसारमाध्यमांशी संबंधित कामासाठी प्रवास करताना रेल्वे भाड्यात 50 टक्के सूट दिली जात असे. याशिवाय पत्रकारांना (Journalist) वर्षातून दोनदा पत्नी आणि मुलांसह प्रवास करतानाही सवलत मिळत होती.

9) डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ : कोणत्याही कारणासाठी प्रवास करणाऱ्या अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांना (Doctors) रेल्वे तिकिटांवर 10 टक्के सूट दिली जात असे. याशिवाय, नर्सला सुट्टी किंवा ड्युटीवर जाण्यासाठी सेकंड आणि स्लीपर क्लासच्या तिकिटांवर 25 टक्के सवलत मिळत होती.

वरील सर्व प्रकारच्या व्यक्तींना मिळणाऱ्या सवलती आता बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे.

आता फक्त ‘या’ प्रवाशांना मिळणार सवलत

1) दिव्यांग व्यक्ती

– इतरांच्या मदतीशिवाय प्रवास करू न शकणाऱ्या दिव्यांग (Specially Abled) लोकांना रेल्वे भाड्यात सवलत मिळणार आहे. अशा लोकांना फर्स्ट आणि सेकंड क्लास एसीमध्ये 50 टक्के आणि इतर क्लासमध्ये 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

– व्हिज्युअली चॅलेंज्ड (Blind) म्हणजेच दृष्टिहीन व्यक्तींना राजधानी आणि शताब्दी ट्रेनच्या थर्ड एसी आणि चेअर्ड तिकिटांवर 25 टक्के सवलत मिळते. ही सवलत त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही दिली जाते.

– मानसिकदृष्ट्या दिव्यांग (Mentally Challenge) असलेल्या व्यक्ती आणि त्यांना प्रवासात मदत करणाऱ्या एका व्यक्तीला मासिक आणि त्रैमासिक पासवर 50 टक्के सूट मिळते.

– मूकबधिर व्यक्ती आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ट्रेनच्या तिकिटांवर आणि मासिक व त्रैमासिक पासवर 50 टक्के सूट मिळते.

2) रुग्ण

– तपासणी किंवा उपचाराच्या उद्देशानं प्रवास करणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला (Cancer patients) आणि त्याच्या सहप्रवाशाला तिकीटावर 75 टक्के सूट मिळते. स्लीपर क्लास व थर्ड एसीमध्ये 100 टक्के आणि फर्स्ट व सेकंड एसीमध्ये 50 टक्के सूट मिळते.

– थॅलेसेमिया रुग्णाला (Thalassemia Patients) फर्स्ट व सेकंड क्लास एसीमध्ये 50 टक्के आणि इतर क्लासच्या तिकिटांवर 75 टक्के सूट मिळते. ही सवलत त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठीही लागू होते. हीच सवलत हार्ट आणि किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठीही उपलब्ध आहे.

– हिमोफिलियाचा रुग्ण (Haemophilia Patients) आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशाला रेल्वे तिकिटावर 75 टक्के सूट मिळते. फर्स्ट किंवा सेकंड एसी तिकिटांवर मात्र कोणतीही सूट मिळत नाही.

– टीबी (TB Patients) किंवा ल्युपस वल्गारिसनं ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचार किंवा चाचणीसाठी प्रवास करताना रेल्वे तिकिटांवर 75 टक्के सूट मिळते. हीच सूट कुष्ठरोग्रस्तांनाही दिली जाते. अशा रुग्णांना फर्स्ट किंवा सेकंड एसीच्या तिकिटांवर मात्र कोणतीही सवलत दिली जात नाही.

– एड्स (AIDS) आणि ऑस्टोमी रुग्णांसाठी सेकंड क्लास तिकिटांवर 50 टक्के सूट दिली जाते. अशा रुग्णांना मासिक आणि त्रैमासिक पास काढण्यासाठीदेखील 50 टक्के सवलत मिळते.

– अ‍ॅप्लास्टिक अ‍ॅनिमिया आणि सिकलसेल अ‍ॅनिमियाच्या रुग्णांना स्लीपर, एसी 2 टायर, थर्ड एसी, चेअरकार कॅटेगरीतील गाड्यांच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत दिली जाते. मात्र, ही सवलत तेव्हाच उपलब्ध होते, जेव्हा रुग्ण मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांद्वारे मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी प्रवास करतात.

रेल्वे मंत्रालयानं विविध कोट्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं पूर्वीच्या लाभार्थी प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. पण मंत्रालयाने महसुलातील घट लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वेचा महसूल वाढला तर परत यापैकी काही सुविधा रेल्वे मंत्रालय विचारपूर्वक सुरू करेल, अशी आशा करायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *