IPL 2022 : RCB चं भवितव्य आता मुंबई टीम च्या हाती ! RCB चा कर्णधार म्हणतो…

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२०मे । फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने शेवटचा साखळी सामना जिंकला आणि १६ गुणांसह चौथे स्थान मिळवले. विराट कोहलीच्या (Virat Kohli) जोरावर मिळवलेल्या या विजयासह त्यांनी आपले प्ले-ऑफचे आव्हान जिवंत ठेवले, पण पुढची फेरी गाठणं हे पूर्णपणे त्यांच्या हातात नाही. दिल्लीच्या संघाचा सध्या एक सामना शिल्लक आहे. त्यांचा नेट रनरेटही जास्त आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने दिल्लीला पराभूत केले तरच बंगलोरची प्ले-ऑफमधील जागा निश्चित होईल. अशा परिस्थितीत बंगलोरचा संघ या सामन्यात मुंबईला पाठिंबा देणार असून रोहित शर्मा नक्कीच एक दमदार खेळी करेल, असा विश्वास RCB चा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला.

“आजचा सामना जिंकणं ही खूपच आनंददायी गोष्ट आहे. शेवटचा साखळी सामना जिंकणे हे नेहमीच महत्त्वाचे असते. तू एक संघ म्हणून किती चांगले आहात हे यातून स्पष्ट होतं. गुजरात विरूद्धच्या सामन्यातील चांगली गोष्ट म्हणजे आम्ही सांघिकदृष्ट्या खूप चांगले खेळलो. सामन्यावर आमचे चांगले नियंत्रण होते. आज जिंकलो असो तरी दिल्ली-मुंबई सामन्यावर आमचं भवितव्य अवलंबून आहे. एक-दोन खराब सामन्यांमुळे आम्ही अशा परिस्थितीत अडकलो आहोत. त्या सामन्यात आम्ही मुंबईला पाठिंबा देणार हे नक्की आहे. तसेच, रोहित शर्मा त्या दिवशी मोठी खेळी करेल असा मला विश्वास आहे”, अशी मिस्कील पण महत्त्वाची प्रतिक्रिया डु प्लेसिसने दिली.

विराट माजी कर्णधार असलेल्या RCB संघाचे सध्या १४ सामन्यात १६ गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट -०.२५३ आहे. हीच त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण आता यंदाच्या साखळी फेरीच्या सामन्यांपैकी केवळ दिल्लीचा संघ RCB एवढे गुण मिळवू शकतो. दिल्ली कॅपिटल्स सध्या १३ सामन्यांत १४ गुणांवर आहेत. त्यांचा नेट रन रेट +०.२५५ इतका आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाने त्यांना पराभूत केलं तरच RCB ला पुढील फेरीचं तिकीट मिळेल. पण दिल्लीचा संघ जिंकला तर RCB थेट स्पर्धेबाहेर जाईल.

“विराटच्या दमदार खेळीमुळे मी खूपच खुश आहे. तो नेट्स मध्ये सराव करताना प्रचंड मेहनत घेत होता. त्यामुळे सामन्यात त्याची फलंदाजी पाहून मला मजा आली. तो जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो एकहाती सामने जिंकवून देऊ शकतो हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे अशा वेळी त्याच्याबरोबर फलंदाजी करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते”, असे डु प्लेसिस म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *