अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर बृजभूषण सिंह यांची टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२०मे । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. परंतु राज यांच्या या निर्णयावर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या,” असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.

बृजभूषण सिंह म्हणाले की, “राज ठाकरे फार दुर्दैवी आहेत. दुर्दैव त्यांचा पाठलाग सोडत नाही. त्यांच्याकडे एक संधी होती. परंतु या संधीला ते पुन्हा मुकले. उत्तर प्रदेश, उत्तर भारतचे लोक महान आहेत. जर त्यांनी आमच्या संतांची माफी मागितली असती, योगींची, मोदींची माफी मागितली असती तर त्यांचा राग शांत झाला असता. माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या ताज्या केल्या. त्यामुळे मी ठरवलंय की मी माझा कोणताही कार्यक्रम स्थगित करणार नाही.”

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया
राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपला दौरा स्थगित केला. राज ठाकरे यांच्या पायावर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया होणार आहे. राज यांच्या पायाचं दुखणं वर्षभरापूर्वीच आहे. परंतु जुनं दुखणं पुन्हा बळावल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध केला होता. “उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी केला होता. तर मुस्लीम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *