पुणे-दौंडदरम्यान धावली पहिली इलेक्ट्रिक लोकल; बारा डब्यांच्या गाडीचे नियोजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मे ।। पुणे-दौंडदरम्यान पहिली इलेक्ट्रिक लोकल सोमवारी धावली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या मार्गावर धावत असलेली डेमू दुरुस्तीसाठी गेल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात इलेक्ट्रिक लोकल (मेमू) चालवण्यात येत असून, ही कायमस्वरूपी नसणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. नुकताच दौंडसह सोलापूर विभागातील बहुतांश परिसर पुणे विभागात समाविष्ट झाला आहे.

त्यामुळे दौंडला उपनगरचा दर्जा मिळेल आणि येथून इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू होईल, अशी प्रवाशांना आशा वाटत होती. यासंदर्भात अनेक प्रवासी आणि प्रवासी संघटनांची मागणी होती. ती मागणी तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण झाली असेच ही गाडी सुरू झाली असल्यामुळे म्हणावे लागणार आहे. 12 डब्बे असलेली ही इलेक्ट्रिक लोकल पुढील काही दिवस पुणे-दौंडदरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांना सेवा पुरवणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि प्रवासी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पुण्यात मेमूसाठी रेल्वे प्रशासन करणार प्रयत्न
पुणे- दौंडच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात ई-मेमूचा रेक घेतला आहे. मात्र, माटुंगाहून ‘डेमू’चा रेक दुरुस्ती करून आल्यानंतर पुन्हा ‘ई-मेमू’ भुसावळला देण्यात येणार आहे. हा रेक भुसावळला गेला तर पुणे ते दौंड दरम्यान पुन्हा ‘डेमू’ धावण्याची शक्यता आहे. यामुळे मेमू रेक पुण्यातच राहावा, यासाठी पुणे रेल्वे विभाग विशेष प्रयत्न करणार आहे.

पुणे-दौंड मार्गावरील डेमू दुरुस्तीसाठी गेली आहे. त्यामुळे आम्ही या मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात इलेक्ट्रिक मेमू चालवण्यास सुरुवात केली आहे. दौंड-पुणे मार्गावर इलेक्ट्रिक मेमू असावी, अशी अनेक संघटनांची मागणी आहे. ती आम्ही रेल्वे बोर्डाकडे पाठवली आहे.
– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग.

इलेक्ट्रिक लोकल सुरू झाल्यामुळे दौंड-पुणे प्रवासी संघाची 2015 पासूनची मागणी मान्य झाली आहे. दौंड-पुणे-दौंड मार्गावर इलेक्ट्रिक मेमू लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाबरोबर झगडत होतो. त्या लढ्याला यश आले असून ही गाडी सुरू झाली आहे.
– विकास देशपांडे, दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघ.

पुणे-दौंड-पुणे मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्यासाठी लोकल सुरू व्हावी, यासाठी आम्ही मध्य रेल्वेकडे मागणी केली होती. ती मान्य झाली आहे. त्यांचे मनापासून आभार.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *