महागाई; १८ जुलैपासून GST दरात वाढ ; आता तुमचं खाणं पिणं महागणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । महागाईची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. आधीच महागाईने खिसा रिकामा होत असताना आता दरवाढीची झळ अधिकच तीव्र होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटीची बैठक पार पडली. या बैठकीत काही जीवावश्यक वस्तूंवर GST लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

GST परिषदेच्या बैठकीत काही वस्तूंवर असलेली कर सवलत मागे घेण्यात आली आहे. तर, काही वस्तूंवरील GST दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. नवीन करवाढ ही येत्या 18 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीच वाढ होईल.

GST परिषदेच्या या निर्णयानंतर 18 जुलैपासून काही वस्तूंवरील करात वाढ होणार आहे. यामध्ये पाकिट बंद आणि लेबल असलेल्या (फ्रोजन वगळता) खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. याशिवाय टेट्रा पॅक आणि बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

विशेष बाब म्हणजे आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते. मात्र आता त्यावर GST सह कर लावण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला आहे. दुसरीकडे बजेट हॉटेल आणि रुग्णालयातील खोल्यांच्या दरावरही जीएसटी लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत हॉटेलच्या प्रतिदिवस 1000 रुपये भाडे दर असणाऱ्या रुमसाठी जीएसटी लागू करण्यात आले नव्हते. आता, या खोल्यांसाठी 12 टक्के कर लागू करण्यात आला आहे. त्याशिवाय, रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *