Ashadhi Wari 2022 : ”विठोबा-रखुमाई” व “ज्ञानोबा-तुकारामाच्या” जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमत ; तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत उत्साहात संपन्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । इंदापूर (indapur) तालुक्यातील बेलवाडी येथे आज (गुरुवार) संपूर्ण राज्यातील (maharashtra) लाखो भाविकांचे लक्ष लागून असलेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.  

इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम आटोपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा पालखी सोहळा बेलवाडी येथे दाखल झाला. लाखो वैष्णव देहूतून (dehu) निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

”विठोबा-रखुमाई” व “ज्ञानोबा-तुकारामाच्या” जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमत होता. टाळ-मृदुंगाचा गजर व मुखी अभंगाची वाणी घेऊन गेल्या दहा दिवसांपासून पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी निघालेल्या वैष्णवांना देवाच्या अश्वांचे पहिले गोल रिंगण पाहण्याची ओढ लागली होती. सुरवातीला बेलवाडी येथे मेढ्यांनी प्रदक्षिणा घातली. त्यानंतर झेंडेकरी, हंडा, तुळशी, पखवाजे, टाळकरी, विणेकरी यांनी भक्तिमय वातावरणात प्रदक्षिणा घातल्या. लाखो भाविकांचे डोळे अश्वांच्या शर्यतीचा तो विलक्षण क्षण टिपण्यासाठी सज्ज झाले.

वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या देवाच्या अश्वाने मानाच्या घोड्याला शिवून रिंगण सोहळ्याला पूर्णविराम दिल्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. वारकऱ्यांनी फुगडी, लांबउड्या, दोरीवरच्या उड्या मारत कसरती करून रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *