Fertiliser : खते महागणार? बळीराजाचा खर्च वाढणार; रशियाकडून सवलतीच्या दरात खत देणं बंद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ सप्टेंबर । शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बातमी आहे. जागतिक खत पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यानं रशियानं (Russia) भारताला (India) डायअमोनियम फॉस्फेटसारखी (डीएपी) खते (Fertiliser) सवलतीच्या दरात देणं बंद केलं आहे. याबाबतचे वृत्त इकोनॉमिक टाइम्सने दिले आहे. त्यामुळं खते महागण्याची शक्यता आहे. याचा भार शेतकऱ्यांवर (Farmers) पडणार असून त्यांचा खर्च वाढणार आहे.

चीननेही खतांची निर्यात केली कमी
गेल्या वर्षी रशिया हा भारताला सर्वात मोठा खतांचा पुरवठा करणारा देश बनला होता. हा पुरवठा सवलतीच्या दरात केला जात होता. मात्र, आता बाजारपेठेतील किमतीप्रमाणे खतांचा पुरवठा करण्याची भूमिका रशियाच्या कंपन्यांनी घेतली आहे. त्यामुळं भारतात खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुलं शेतकऱ्यांचा खर्च वाढू शकतो. दरम्यान, जागतिक स्तरावरील वाढत्या किमतीमुळे चीननेही खतांची निर्यात कमी केली.

भारताचा आयात खर्च वाढू शकतो
रशियन कंपन्यांनी बाजारातील किमतींनुसार खते देण्याच्या निर्णयामुळे भारताचा आयात खर्च वाढू शकतो. त्यामुळं जागतिक किमतीत वाढ होत असताना सबसिडीचा भार देखील वाढू शकतो. जागतिक बाजारात खतांची किंमती वाढ असल्यानं चीनने देखील परदेशातील खतांची विक्री कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. खतनिर्मिती क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापुढं रशियाच्या कंपन्यांकडून खते सवलतीच्या किंमतीत मिळणार नाहीत. 2022-23 या वित्तीय वर्षात भारताने रशियाकडून 4.35 टन खते आयात केली आहेत. या आयातीचे प्रमाण 246 टक्क्यांनी वाढल्याची माहिती त्या अधिकाऱ्याने दिली आहे.

रशियाकडून भारताला मोठ्या प्रमाणात खतांची निर्यात
मागील वर्षी रशियाने भारताला मोठ्या प्रमाणात खतांची विक्री केली होती. त्यामुळं खतांच्या निर्यातीमध्ये चीन, इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती या देशांचा वाटा कमी झाला होता. सवलतीच्या दरात रशियाकडून खतांचा पुरवठा केला जात होता. त्यामुळं भारतात मोठ्या प्रमाणात खतांची आयात झाली होती. मात्र, आता सवलतीच्या दरात खतांची आयात होणार नसल्यानं भारताचा खर्च वाढू शकतो. परणामी खतांची किंमती वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गव्हाच्या पिकासाठी खतांची मागणी वाढली
गेल्या दोन महिन्यांपासून जागतिक बाजारात खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. अशातच गव्हाच्या पिकासाठी खतांची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळं आता भारतीय कंपन्यांसाठी आगामी हिवाळी हंगामासाठी खतांचा साठा जमा करणं आव्हानात्मक झाल्याची माहिती मुंबईतील एका खत कंपनीच्या अधिकाऱ्यानी दिली आहे. भारतातील महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकांआधीच जागतिक बाजारात खतांच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खतांचा पुरवठा करण्यासाठी अनुदान देण्याशिवाय सरकारकडं पर्याय नसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *