“आमचा एन्काऊंटर होऊ शकतो”; तुरुंगातून शिफ्ट करताना आझम खान यांना भीती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑक्टोबर | समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्लाह आझम खान यांना वेगवेगळ्या तुरुंगात शिफ्ट करण्यात येणार आहे. खान यांना आज रविवारी ५ वाजता रामपूर जिल्ह्यातून बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर, त्यांना सितापूर येथील कारागृहात पाठविण्यात येईल, अशी सुत्रांची माहिती आहे. तर, आझम यांचा मुलगा आणि स्वार मतदारसंघातील आमदार अब्दुल्लाह आझम खान यांना हरदोई जिल्ह्यात शिफ्ट करण्यात येत आहे. दरम्यान, कारागृहातून बाहेर काढण्यात येत असताना आझम खान यांनी आपल्या एन्काऊंटरची भीती व्यक्त केली आहे.

आझम खान यांची पत्नी आणि माजी राज्यसभा खासदार तंजीन फातिमा यांना रामूपर जिल्हा कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. अब्दुल्लाह आझम खान यांच्या डबल जन्म प्रमाणपत्र प्रकरणात आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्लाह आझम यांना न्यायालयाने १८ ऑक्टोबर रोजी ७-७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आझम यांच्यासह सर्व आरोपींना रामपूर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले. मात्र, आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना रामपूर जिल्हा कारागृहातून दुसरीकडे शिफ्ट करण्यात येत आहे. सपा नेते आझम खान यांना सितापूर जिल्हा कारागृहात पाठविण्यात येत आहे. यादरम्यान, रामपूर कारागृहातून बाहेर काढत असताना, ”हमारा एन्काऊंटर भी किया जा सकता है”.. असं आझम खान यांनी म्हटलं.

आझम खान यांना पहाटेच्या सुमारास रामपूर कारागृहातून शिफ्ट करण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्लाह आझम हे दोघेही दिसून येतात. अब्दुल्लाह यास पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये बसवले असून शिफ्टींग करण्यासाठी रवाना करण्यात येत आहे. तर, आझम खान यांनाही पोलीस दुसऱ्या गाडीत बसण्याचं सांगत आहेत. त्यावर, आझम खान मी गाडीत मधोमध बसणार नाही, एका बाजुला बसेन, असे म्हणताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *