Railway Station Flyover : पुणे रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल पाडणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर | पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी १२ मीटर रुंदीच्या पुलाला आता रॅम्पने जोडले जाणार आहे, तसेच चार लिफ्ट बसविल्या जाणार आहेत. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून, येत्या काही दिवसांत कामाला सुरुवात होईल. तत्पूर्वी ३.६ मीटर रुंदीचा जुना पादचारी पूल पाडण्यात येणार आहे. हे काम करताना स्थानकावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

पुणे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. स्थानकावर सद्यःस्थितीत तीन सरकते जिने आहेत. दिव्यांग अथवा ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरवर बसवून घेऊन जाणे अवघड जाते. ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १२ मीटर लांबीच्या पादचारी पुलाला रॅम्प जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे ज्येष्ठ आणि दिव्यांग प्रवाशांना व्हीलचेअरचा वापर करून रॅम्पवरून घेऊन जाणे सोपे होईल. शिवाय प्रवाशांना प्रत्येक फलाटावर सहजरित्या जाता यावे, या करिता लिफ्टही बसविल्या जाणार आहेत. त्यासाठी जागेची निश्चिती झाली आहे.

रॅम्पचे विस्तारीकरण

रॅम्प असलेला पादचारी पूल खूप जुना झाला आहे. त्याची स्थिती खराब असल्याने कोरोनाकाळात तो बंद होता. थोडी डागडुजी करून दिव्यांग प्रवाशांसाठी पुन्हा खुला केला. आता त्याचा वापर सर्वच प्रवाशांकडून केला जात आहे. आता रेल्वे प्रशासनाने हाच पूल पाडण्याचा निर्णय घेतला. याला जोडलेले रॅम्प तसेच ठेवण्यात येतील. १२ मीटरच्या पुलाला जोडण्यासाठी याच रॅम्पचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांची सोय होईल.

सोलापूरच्या दिशेने पुलाचे विस्तारीकरण गरजेचे

सोलापूरच्या दिशेने असलेल्या फलाट एक ते तीनला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. मेमध्ये मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक धनंजय नाईक यांनी स्थानकाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुलाच्या विस्तारीकरणाच्या सूचना दिल्या. वाणिज्य विभागाने तसा प्रस्तावही मुख्यालयाला दिला. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. हा पूल अर्धवट असल्याने प्रवाशांची गैरसोय होते.

रेल्वे बोर्डाने लिफ्ट व रॅम्पच्या कामाला मंजुरी दिली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. कामासाठी सुमारे १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

– डॉ. रामदास भिसे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

स्थानकावर लिफ्ट बसविण्याची मागणी अनेक महिन्यांपासून केली जात होती. यासाठी वारंवार निवेदने दिली. आता लिफ्ट बसविल्या जाणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होईल. हे काम लवकर होणे गरजेचे आहे.

– निखिल काची, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती

६ फलाट – पुणे रेल्वे स्थानक

दीड लाख – दैनंदिन प्रवासीसंख्या

२५० – एकूण रेल्वेगाड्या

४ – एकूण पादचारी पूल

७२ – स्थानकावरून गाड्या

४१ – लोकलच्या फेऱ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *