आता ‘हवा’ येऊ द्या होणार बंद ; येत्या आठवड्यात शेवटच्या भागाचं शूट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । ‘कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा, आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या संवादाची महाराष्ट्राला गेली १० वर्षे सवय झाली आहे. या संवादासह एकेकाळी लोकप्रिय ठरलेला ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कार्यक्रमाची लोकप्रियता ओसरतानाच कार्यक्रमाच्या ‘टीआरपी’नेही तळ गाठला. परिणामी, येत्या आठवड्यात कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे.

टीव्हीच्या छोट्या पडद्यावर मराठी मनोरंजनसृष्टीला स्वतःच्या कामाचा, कलाकारांचा, कलाकृतींच्या प्रसिद्धीचा डंका कसा वाजवायचा? हे शिकवण्याचे काम ‘चला हवा येऊ द्या’ने केले. रितेश देशमुख यांच्या ‘लयभारी’ या चित्रपटाच्या निमित्ताने सन २०१४च्या मध्यावर ‘हवा’ची भट्टी जमली होती. झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर नवी मालिका सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी होते. ‘झी स्टुडिओज’चा लयभारी चित्रपट जुलै २०१४मध्ये प्रदर्शित होणार होता. चित्रपटाची अनोख्या ढंगाने प्रसिद्धी होण्यासाठी वाहिनीचे तत्कालीन अधिकारी नव्या संकल्पना मांडत होते. त्यात दीपक राज्याध्यक्ष, निलेश मयेकर, निखिल साने यांचे विशेष योगदान होते. वाहिनीतील संदेश घुगे याने विशेष एपिसोडची आखणी केली. त्यातूनच ‘लयभारी स्पेशल’ या एपिसोडच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. निलेश साबळे यांच्यावर होती. त्यांच्या साथीला कुशल बद्रिके, भाऊ कदम होते. हा भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. अवघ्या १२ तासांत तयार झालेल्या या कार्यक्रमाला पुढे ‘चला हवा येऊ द्या’चे स्वतंत्र रूप देण्यात आले.

निलेश साबळे यांनी ‘फू बाई फू’चे सहकलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्यासह सुरू केलेल्या या कार्यक्रमावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीही फिदा झाली. पण, अलीकडे हा कार्यक्रम सुमार होत चालल्याची प्रेक्षकांची तक्रार होती. विविध पर्व, उपक्रम राबवूनही त्यास यश येत नव्हते. वाहिनीच्या नव्या धोरणांमुळे हा कार्यक्रम अखेर बंद होणार असल्याचे समजते आहे.

नवे पर्व सुरू होणार?
‘चला हवा येउ द्या’ कार्यक्रम थांबत असला तरीही प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण चमूला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तूर्तास आपण थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पण, पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते.
– डॉ. निलेश साबळे, अभिनेता-दिग्दर्शक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *